मोदी-शहांकडून संकेत नसल्याने उत्कंठा; संरक्षण मंत्रिपद सोडण्याचे जेटलींचे संकेत  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसरया मंत्रिमंडळ फेरबदलांचे गूढ गुरूवारी चांगलेच पिकले. एक तर फेरबदल उद्य (शनिवार) सायंकाळी होईल आणि नाहीच झाला तर त्याचा मूहूर्त थेट सप्टेंबरअखेरीसपर्यंत लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, संरक्षणमंत्रिपदाच्या अतिरिक्त जबाबदारीतून लवकरच मुक्त होण्याचे संकेत अर्थमंत्री अरूण जेटलींनी दिले.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे शुक्रवार व शनिवार तिरूपतीच्या दौरयावर आहेत. ते शनिवारी दुपारी दिल्लीत परततील. ते रविवारी सकाळी दोन दिवसांसाठी गुजरात दौरयावर जातील. तर पंतप्रधान मोदी शनिवारी मध्यरात्री चीन व म्यानम्यारच्या दौरयावर रवाना होतील आणि बुधवारी (दि. ६ सप्टेंबर) परततील. तोपर्यंत पितृपंधरवडा चालू झाला असेल. तो वीस सप्टेंबर चालेल. त्यानंतर नवरात्र. मध्येच २४ व २५ सप्टेंबरला भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीमध्ये विस्तारित बैठक आहे. अशास्थितीत उद्या (शनिवार) झालाच नाही तर मंत्रिमंडळ फेरबदल थेट सप्टेंबरअखेरपर्यंत होण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती भाजप मुख्यालयातील विश्व्सनीय सूत्रांनी दिली. शनिवारबद्दल खात्रीने सांगण्याबाबत त्यांनी कानावर हात ठेवले.

संरक्षण, शहरी विकास, माहिती व प्रसारण, वने व पर्यावरण यासारख्या महत्वाच्या रिक्त खात्यांचा तात्पुरता कार्यभार इतर मंत्र्यांकडे दिला असला तरी फेरबदलाच्या चर्चेने संसद अधिवेशन संपल्यापासून जोर धरला आहे. संयुक्त जनता दल व अण्णाद्रमुक या नव्या मित्रांना स्थान व निवडणूक असलेल्या कर्नाटक व राजस्थानमधून काही चेहऱ्यांना संधी देण्यासाठी फेरबदल केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कामगिरी समाधानकारक नसल्याने काही मंत्र्यांना नारळ देण्याचीही चर्चा आहे.

राजधानीत अनेक नावांच्या कंडय़ा पिकल्या आहेत. मात्र, मोदी व शहा यांच्याकडून कोणताच स्पष्ट संकेत नाहीत.  त्यातच फेरबदलांचा कथित मूहूर्त दरवेळी लांबणीवर पडतो आहे. अमित शहा आज व उद्या संघाच्या समन्वय बैठकीला वृंदावनला जाणार आहेत.

जेटलींचे संकेत

मोदी-शहांकडून कोणताच संकेत मिळत नसताना जेटलींनी मात्र अप्रत्यक्षरीत्या लवकरच फेरबदल होणार असल्याचे सूचित केले. त्यांच्याकडे अर्थमंत्रालयाबरोबर संरक्षण खातेही आहे. त्याबाबत छेडले असता ते म्हणाले, ‘ही अतिरिक्त जबाबदारी आणखी फार काळ नसण्याची अपेक्षा आहे.’ पण अर्थातच ते काही मी ठरविणार नाही. जेटलींच्या या टिप्पणीने दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. एक म्हणजे अर्थमंत्रिपद त्यांच्याकडे राहील आणि लवकरच नवा संरक्षणमंत्री मिळेल.

चर्चा गुजरातची; अफवा फेरबदलांची

भाजप अध्यक्ष अमित शहांनी गुरूवारी सकाळी आपल्या निवासस्थानी अरूण जेटली, ग्रामविकास मंत्री नरेंद्र तोमर, मंत्री निर्मला सीतारामन, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, विधी व न्याय राज्यमंत्री पी.पी. चौधरी आदी मंत्र्यांची बैठक बोलावल्याने फेरबदलाच्या चर्चेमध्ये तेल ओतले गेले. पण प्रत्यक्षात ती बैठक गुजरात निवडणुकीच्या तयारीबाबत होती. जेटली हे निवडणूक प्रमुख तर तोमर, सीतारामन, डॉ. सिंह हे सहप्रभारी आहेत. त्यांच्याशिवाय राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल, गुजरातचे प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष जितूभाई वाघानी हे सुद्धा बैठकीला उपस्थित होते.