भारत-भूतान संबंध दृढ करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्याच परदेश दौऱ्यामध्ये केला. भूतानचा हा दौरा आपल्यासाठी खास आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात भूतानचे विशेष स्थान असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
मोदींनी भूतानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलाचे उद्घाटन केले. भूतान-भारत द्विपक्षीय संबंधांचा उल्लेख मोदींनी बीटूबी म्हणजे भारत ते भूतान असा भूतानच्या राजे जिग्मी कसेर नामग्याल वांचुक आणि पंतप्रधान शेरिंग तोग्बे यांच्याशी बोलताना केला. भूतानच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.नरेंद्र मोदी हे सहृदय आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे, अशा शब्दांत भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोग्बे यांनी कौतुक केले. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. या दौऱ्याचा फायदा द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होण्यात होतील, असा विश्वास तोग्बे यांनी व्यक्त केला.
भूतान दौऱ्यात मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. भारत-भूतान संबंधांची मोदींना जाण आहे. जलविद्युत प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली. भारताबरोबरचे आर्थिक संबंध दृढ करण्याचा प्रयत्न राहील, असे भूतानच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले. भारतीय कंपन्या मोठय़ा प्रमाणात भूतानमध्ये गुंतवणूक करत असून, त्यांचे इतर गरजा तातडीने पूर्ण कशा होतील याकडे आम्हाला लक्ष द्यावे लागेल. मोदींच्या भेटीनंतर द्विपक्षीय संबंधांना नवे परिमाण प्राप्त होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भूतान आणि भारत यांचे खास संबंध आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाल्याचे मोदींनी सांगितले. भूतानने लोकशाहीच्या मार्गाने मर्यादित राजीशाहीकडे केलेली शांततापूर्ण वाटचाल कौतुकास्पद आहे. भूतानने जी मोठी आर्थिक झेप घेतली आहे ती भारताला समाधान देणारी असल्याचे मोदींनी सांगितले. जलविद्युत प्रकल्पांमध्ये परस्पर विश्वासाच्या आधारावर आमचे जे सहकार्य आहे ते विभागातील इतर देशांसाठी आदर्शवत असल्याचे मोदी म्हणाले. आपल्या दौऱ्यात मोदी खोलंचू जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत.
भूतान दौऱ्यात मोदींसमवेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल आणि परराष्ट्र सचिव सुजाता सिंह या आहेत.