सात महिन्यांच्या प्रवासानंतर अमेरिकेच्या नासा या अवकाश संस्थेची ‘परसेव्हेरन्स’ ही बग्गीसारखी गाडी मंगळावर उतरवण्यात यश आले आहे. आतापर्यंतची ही सर्वात प्रगत गाडी असून शुक्रवारी अतिशय उत्कंठावर्धक वातावरणात ती मंगळावर उतरली. मंगळावरील सूक्ष्म जीवसृष्टीचा शोध घेण्याचे काम ही गाडी करणार आहे.

अतिशय प्रगत तंत्रज्ञान या गाडीत वापरण्यात आले असून ही मंगळ मोहीम २०२०  गेल्या ३० जुलैला सुरू झाली होती. गेल्या वर्षी फ्लोरिडातील केप कॅनव्हरॉल येथून अवकाशयानासह ही गाडी पाठवण्यात आली होती. ही रोव्हर गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर सुरक्षित उतरली असून जेझेरो विवरात ती अलगद उतरली. पृथ्वीपासून ४७२ दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करून ही गाडी उतरली असून मंगळावरचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे. नासाच्या इतिहासात अशा प्रकारची गाडी सोडण्याची ही पहिलीच वेळ नव्हती, पण तरी उत्कंठा कायम होती कारण अशा प्रकारे गाडी एखाद्या ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरवणे हे कौशल्याचे काम असते.

नासाने या उड्डाणाने अवकाशमोहिमांच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

नासाचे प्रशासक स्टीव्ह जुरझिक यांनी सांगितले, की मानवाचा भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न यातून दिसतो. एका मोटारीच्या आकाराइतकी १०२६ किलोची रोव्हर गाडी या मोहिमेत अनेक आठवडे तेथील पृष्ठभागावर चाचण्या करणार आहे. जेझेरो विवरात ती उतरली आहे.

स्वाती मोहन यांचे नेतृत्व

अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेची ‘परसेव्हेरन्स’ ही बग्गीसारखी मोठी गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर उतरवण्याच्या अंतिम थरारक काळातील नेतृत्व एका भारतीय अमेरिकी महिलेने केले आहे. त्यांचे नाव स्वाती मोहन. त्यांनीच मार्स २०२० मोहिमेतील या अंतिम क्षणांना यशाची किनार चढवली. मंगळाच्या वातावरणातून रोव्हर गाडी तेथील वातावरणातून पृष्ठभागावर उतरवतानाचा जो काळ असतो त्याला कुठल्याही मोहिमेतील थरारक काळ मानला जातो. या काळात स्वाती मोहन यांनी या रोव्हर गाडीला मार्गदर्शन, दिशादर्शन करून र्सवकष नियंत्रण यशस्वीपणे पार पाडले.

मोहन यांनी सांगितले की, परसेव्हेरन्स ही गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरली असून अतिशय अवघड अशी कामगिरी यातून आम्ही पार पाडली आहे. मार्गदर्शन, दिशादर्शन, नियंत्रण हे या मोहिमेत अवकाशयानाचे कान व डोळे असतात ते योग्य प्रकारे काम करीत असतील तरच रोव्हर गाडी यशस्वीपणे उतरू शकते. स्वाती मोहन या उत्तर व्हर्जिनियातून लहानाच्या मोठय़ा झाल्या. नंतर वॉशिंग्टन महानगरात आल्यानंतर त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून यांत्रिकी व अवकाशगतिकी अभियांत्रिकीत पदवी व पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांनी एरॉनॉटिक्स व अ‍ॅस्ट्रॉनॉटिक्स या शाखात मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून पीएचडी केली आहे. नासामध्ये काम करीत असताना मोहन यांची पहिल्यांदा शनीवरील कॅसिनी मोहिमेसाठी निवड झाली त्यावेळी चंद्रावरील ग्रेल मोहिमेतही त्यांचा सहभाग होता. मंगळ २०२० मोहिमेतही त्यांचा सिंहाचा वाटा होता. २०१३ पासून त्या अवकाश मोहिमांत काम करीत आहेत.  मोहन यांनी सांगितले की, स्टार ट्रेक ही मालिका दूरचित्रवाणीवर लोकप्रिय होती त्यातून आपल्याला अवकाश मोहिमांत काम करण्यात रस वाटू लागला.