पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नवाझ शरीफ हे पुढील आठवडय़ात चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ४ ते ८ जुलै या दरम्यान शरीफ चीन दौऱ्यावर जाणार असून त्यांच्यासमवेत उच्चस्तरीय शिष्टमंडळही आहे.
चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी शरीफ यांना चीन भेटीचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाचा स्वीकार शरीफ यांनी तातडीने केल्याने पाकिस्तान आणि चीनचे संबंध किती जवळचे आहेत, ते अधोरेखित होत असल्याची चर्चा आहे.
शरीफ यांच्या भेटीची तयारी करण्यासाठी आणि शरीफ व केक्वियांग यांच्यात झालेल्या चर्चेच्या पाठपुरावा करण्यासाठी पाकिस्तानचे नियोजनमंत्री एहसान इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली कृती पथक स्थापन करण्यात आले असून त्यांनी २४ ते २६ जून या कालावधीत चीनचा दौरा केला.
या भेटीत अनेक प्रस्तावांवर व्यापक चर्चा करण्यात येणार असून त्यांना शरीफ यांच्या चीन भेटीत अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे शरीफ चीनच्या वित्तीय आणि उद्योगक्षेत्रातील दिग्गजांशीही चर्चा करणार आहेत. विशेष आर्थिक क्षेत्र आणि औद्यौगिक केंद्रांनाही ते भेटी देणार आहेत.