भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र, दुसरीकडे तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंकेत तमिळ नागरिकांवर होत असलेल्या अन्यायांमुळे आमची भूमिका कायम आहे. राजपक्षे येत असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्ही तमिळ नागरिकांच्या भावनांशी खेळणार नाही, असे जयललिता म्हणाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयललितांसह त्यांच्याकडून एकही प्रतिनिधी या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांना शपथविधी सोहळ्यास बोलविल्यास आपण गैरहजर राहणार असल्याचे, जयललिता यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार आता जयललिता यांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे.