एन. डी. पाटील, खासदार  धैर्यशील माने यांची टीका

कोल्हापूर  : कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांच्या ‘महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमाभागातील नेत्यांना गोळ्या घाला,’ या वादग्रस्त विधानावर आता महाराष्ट्रात पडसाद उमटू लागले आहेत. या वक्तव्यावर सीमा लढय़ातील नेते प्रा. एन. डी. पाटील, शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी शुक्रवारी जोरदार टीका केली आहे.

कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांच्या मराठी अस्मितेची कर्नाटक सरकारकडून वारंवार गळचेपी होत असताना आता त्यात भीमाशंकर पाटील यांनी भर घातली आहे. ‘भाषावार प्रांतरचने दरम्यान कर्नाटकात अडकलेल्या मराठी भाषिकांना आणि हा लढा सुरू ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला असे’  वादग्रस्त वक्तव्य पाटील यांनी गुरुवारी केले होते. त्यावर आज कोल्हापुरातून खरमरीत प्रतिक्रिया उमटल्या.

भीमाशंकर यांना उद्देशून प्रा. एन. डी. पाटील यांनी हे महाशय कोण आहेत? अशी विचारणा करून त्यांचे नाव मी पहिल्यांदाच ऐकले आहे, असा टोला लगावला. सीमा लढा मी अनेक वर्षे आतून बाहेरून पाहत आहे. त्यातही अनुभव पाहता भीमाशंकर सारख्याच्या वक्तव्यांनी सीमाप्रश्नी चळवळ कधीच थांबणार नाही. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून अद्याप त्याचा निकाल लागायचा आहे. त्याआधीच अशी वक्तव्ये करणे शोभणारे नसल्याचे मत पाटील यांनी नोंदवले आहे.

‘तर शिवसेनेशी गाठ’

महाराष्ट्र एकीकरण समितीतील एकाही कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर गाठ शिवसेनेशी आहे, असा इशारा देत खासदार माने यांनी भीमाशंकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘गेल्या ६४ वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररीत्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात बेजबाबदार, बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो, की कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, याचे उदाहरण घालून देऊ . आजवर महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. भीमाशंकर पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी तसे सांगावे. आजही महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी निधडय़ा छातीने गोळ्या झेलायला लाखो उभे राहतील. पण कर्नाटकातील वंचितांना महाराष्ट्रात आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे ध्यानात ठेवावे. अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल. अज्ञानातून केलेल्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो, असेही माने म्हणाले.