देशातील सध्याची शिक्षण पद्धती मॅकॉलेच्या कटकारस्थानाचा बळी असल्याचे स्पष्ट करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी, या पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून मातृभाषेचा वापर करण्यावर भर दिला.
चाकोरीबद्ध शिक्षण पद्धतीमध्ये आपण बांधलो गेलो आहोत, त्यामुळे त्यामधून बाहेर पडणे गरजेचे आहे, सर्व प्रकारचे ज्ञान पाश्चात्त्य देशांमध्येच आहे, असा विचार करणे अयोग्य आहे, ते आपल्याकडून शिकले आहेत, मात्र ब्रिटिश आल्यानंतर सर्व ज्ञान पाश्चिमात्य देशांमध्येच असल्याची मानसिकता विकसित झाली, असेही गृहमंत्री म्हणाले. येथील जयपुरिया व्यवस्थापन संस्थेच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.
ब्रिटिश इतिहासकार मॅकॉले यांची शिक्षण पद्धती सर्वोत्तम असती तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६७ वर्षे उलटल्यानंतरही देशातील एकही संस्था जगातील २७५ विद्यापीठे आणि १०० तांत्रिक संस्थांमध्ये सर्वोत्तम का ठरली नाही, असा सवालही राजनाथ सिंह यांनी केला. अन्य भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे, मात्र जेथे मातृभाषेत काम होते तेथे एखाद्याने इंग्रजी भाषेचा वापर का करावा, असेही ते म्हणाले.
त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शक्य तितका हिंदूी भाषेचाच वापर करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र अन्य कोणत्याही भाषेला विरोध आहे, असा त्याचा अर्थ काढू नये, विद्यार्थ्यांनी परदेशी भाषेच्या दबावातून स्वत:ला मुक्त करावे आणि मोकळेपणाने विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
‘लष्कर ए तोबया’चे मोडय़ूल उद्ध्वस्त  
पीटीआय, श्रीनगर
उत्तर काश्मीरमधील सोपोर येथील ‘लष्कर ए तोयबा’ या संघटनेचे ‘मोडय़ूल’ शुक्रवारी सुरक्षा दलाने उद्ध्वस्त केला. या वेळी चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. सोपोर पोलीस आणि २२-राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी मिळून ही कामगिरी केली. सोपोर या भागात हल्ला करण्यासाठी या ‘मोडय़ूल’चा वापर करण्यात येत होता, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
तो म्हणाला की, अटकेतील दहशतवाद्यांची ओळख पटली असून तावसिफ अहमद दार, माजिद गुलझार, तावसिफ अहमद दार आणि नमीझ अहमद यातू अशी चौघांची नावे आहेत. हे सर्व जण सोपोर येथील नौपोरा भागात राहणारे आहेत. त्यांच्याकडून दोन हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. १६ ऑक्टोबर रोजी नौपोरा येथील घरांवर केलेल्या हल्ल्यात या ‘मोडय़ूल’चा वापर केला होता.  ‘तोयबा’चे उद्ध्वस्त केलेले तिसरे ‘मोडय़ूल’आहे.