नेपाळ सरकारने शंभर रुपयापेक्षा जास्त मूल्य असलेल्या भारतीय नोटांवर बंदी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका नेपाळला जाणारे भारतीय पर्यटक आणि भारतात काम करणारे नेपाळी कामगारांना बसण्याची शक्यता आहे.

नेपाळमध्ये भारतीय चलनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, नेपाळ सरकारने शुक्रवारी भारतीय चलनातील शंभर रुपयापेक्षा जास्त मूल्य असलेल्या भारतीय नोटांवर बंदी टाकल्याची घोषणा केली. भारतीय नोटा कुणीही बाळगू नये कारण त्याला अजून नेपाळ सरकारने कायदेशीरता दिलेली नाही, अशी माहिती माहिती व प्रसारण मंत्री गोकुळ प्रसाद बसकोटा यांनी दिली.

नेपाळी कामगार भारतात काम करीत असून देशाचे काही पर्यटकही भारतात जातात, त्यामुळे त्यांना सरकारच्या या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. भारत सरकारने दोन हजार, पाचशे व दोनशे रुपयांच्या नोटा २०१६ मधील नोटाबंदीनंतर जारी केल्या होत्या. या नवीन नोटा लोक नेपाळी बाजारात गेली दोन वर्षे वापरत आहेत.