केंद्र सरकारने मॅगीच्या विक्रीवर बंदी घातलेली नसून, ‘नेसले’ कंपनीला त्यांचे हे उत्पादन बाजारातून मागे घेण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या उत्पादनामध्ये ‘मोनोसोडियम ग्लुटामेट’चे प्रमाण जास्त का आहे, याबद्दल खुलासा करावा, असेही आदेश दिले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्ड यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. यासंदर्भात ‘नेसले’ कंपनीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी तेलगू देसम पक्षाच्या खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतान जे. पी. नड्डा म्हणाले, सरकारने ‘नेसले’ कंपनीला पाठवलेल्या नोटिसीला अद्याप त्यांच्याकडून कोणतेच उत्तर मिळालेले नाही. त्यांच्याकडून काही खुलासाही आलेला नाही. मॅगीच्या ज्या चाचण्या भारतामध्ये करण्यात आल्या, त्याबद्दल नेसले कंपनीकडून कोणताही आक्षेपही घेण्यात आलेला नाही. निर्धारित मानकांप्रमाणेच या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर देशातील लोकांच्या आरोग्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.