भारताच्या ‘फेलुदा’ या सोप्या, विश्वासार्ह व किफायतशीर कोविड चाचणीत नेदरलँडने स्वारस्य दाखवले असल्याची माहिती वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळाचे (सीएसआयआर) महासंचालक शेखर मांडे यांनी दिली.

नेदरलँडला त्यांची करोना चाचणी पातळी वाढवायची आहे. त्यामुळे त्यांनी ‘सीएसआयआर’ला पत्र पाठवून या चाचणी संचाबाबत चौकशी केली आहे. फेलुदा चाचणीत त्यांना स्वारस्य आहे याचे कारण, ही अचूक व स्वस्त तसेच कमी वेळात होणारी चाचणी आहे. टाटा समूहाने त्यात व्यावसायिक भागीदारी केली आहे, असे मांडे यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, २८ सप्टेंबरअखेर नेदरलँडमध्ये १,११,१५० रुग्ण असून ६,३६५ जणांचा मृत्यू झाला आहे. फेलुदा चाचणी ही भारताची स्वदेशी चाचणी असून जागतिक पातळीवर ती वापरली जाऊ शकते. आरटी-पीसीआर चाचणीला पूर्वी ४५०० रुपये लागत होते. अजूनही ही चाचणी करण्यास २५०० रुपये तरी लागतात. भारतीय औषध महानियंत्रकांनी या चाचणीला मंजुरी दिली असून त्यात जनुक संपादन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कमी नमुन्यातही अचूक रोगनिदान होते.

‘फेलुदा’ नाव कसे मिळाले?

* पश्चिम बंगालचे लेखक व दिग्दर्शक सत्यजीत राय यांच्या कादंबरींतील ‘फेलुदा’ या पात्रावरून या चाचणीला फेलुदा नाव दिले असून ती चाचणी तयार करण्यात देबज्योती चक्रबर्ती व सौविक मैती यांचा पुढाकार आहे.

* ‘एनएनसीएएस ९ एडिटर लिमिटेड युनिफॉर्म डिटेक्शन’ असे असे या चाचणीचे शास्त्रीय नाव असून त्यात क्रिस्पर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यातून सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणूचा जनुकीय क्रम शोधला जातो.

* गर्भधारणेची चाचणी एका साध्या पट्टीच्या मदतीने केली जाते, तशी ही चाचणी असून त्यात जर शरीरात विषाणू असेल तर पट्टीचा रंग बदलतो. यासाठी महागडी यंत्रणा लागत नाही.

* ही चाचणी आरटी-पीसीआर सारखीच असते. त्यात आरएनए काढून त्याचे डीएनएत परिवर्तन केले जाते, नंतर न्यूक्लिइक अ‍ॅसिडची क्रमवारी तपासून रोग निदान केले जाते. त्यात पुढच्या टप्प्यात क्रिस्पर व एफएनसीएएस ९ चा वापर केला जातो.