काश्मीरच्या विषयावर वादग्रस्त टिवटिव करणारा पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला भारतीय क्रिकेटपटूंनी सणसणीत चपराक लगावल्यानंतर आफ्रिदीने आता आयपीएलबद्दलची खदखद व्यक्त केली आहे. मी आयपीएलमध्ये कधीही खेळणार नाही तसेच आयपीएलमध्ये खेळण्यात मला कधीच रस नव्हता असे आता आफ्रिदीने म्हटले आहे.

नुकत्याच संपलेल्या पाकिस्तान सुपर लीगच्या तिसऱ्या मोसमामध्ये आफ्रिदी खेळला होता. पाकिस्तानची सुपर लीग आयपीएलवर मात करेल असा विश्वासही त्याने व्यक्त केला होता. त्यावेळी त्याने आयपीएलमधून मला बोलावणे आले तरी मी तिथे जाणार नाही. माझ्यासाठी पीएसएल मोठी असून वेळेनुसार पीएसएल आयपीएलला मागे टाकेल असे त्याने म्हटले होते. मी पीएसएलमध्ये आनंदी असून आयपीएलमध्ये मला कधीच रस नव्हता असे त्याने म्हटले होते.

आफ्रिदीचे आयपीएल संबंधीचे ताजे वक्तव्य हे २०१२ सालच्या त्याच्या वक्तव्याशी पूर्णपणे विसंगत आहे. २०१२ मध्ये आफ्रिदीने आयपीएलचे कौतुक केले होते. आयपीएल उत्तम स्पर्धा असून आपण त्यामध्ये खेळण्याचा आनंद लुटला आहे असे आफ्रिदी म्हणाला होता. २००८ च्या पहिल्या मोसमात आफ्रिदी डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळला होता.

काश्मीरसंबंधी काय म्हणाला आफ्रिदी
भारत व्याप्त काश्मीरमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे. तिथे निरपराधांची गोळया झाडून हत्या केली जात आहे. संयुक्त राष्ट्र, अन्य संस्था कुठे आहेत. हा रक्तपात थांबवण्यासाठी ते काहीच का करत नाहीत असे टि्वट आफ्रिदीने केले होते.