जम्मू-काश्मीरमध्ये सध्या दहशतवाद्यांची होणारी भरती हा अभ्यासाचा विषय ठरला असून यातील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी याबाबत एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, सर्वसाधारण काश्मिरी कुटुंबातील अल्पवयीन मुलांचा यासाठी वापर केला जात आहे. या मुलांचा कल मुलतत्ववादी विचारसरणीकडे जाणारा नाही. कारण, ही मुले मदरशांऐवजी सरकारी शाळांमध्ये शिकणारी आहेत. अशा मुलांचे वर्तन हे सर्वसाधारण मुलांसारखे असेल याची काळजी दहशतवाद्यांचे प्रशिक्षक घेत आहेत.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांबाबत तयार केलेल्या ७४ पानांच्या एका गोपनीय अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर सीआयडीने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार खोऱ्यातील स्थानिक मुलेच यासाठी निवडली जातात. दहशतवादासाठी निवडण्यात येणारी मुले ही विभक्त कुटुंबातील नसतात, त्यांचे वय १५-२५ वर्षे दरम्यान असते, अविवाहित मुलांचा यात समावेश असतो, पूर्वी ज्यांच्यावर कुठलेही पोलिस रेकॉर्ड नाही तसेच सर्वसाधारण मुलांसारखीच वागणूक असणारी मुले, अशांचा समावेश आता नवे दहशतवादी घडवण्यामध्ये केला जात आहे.

काश्मीरी मुलांमध्ये मुलतत्ववादाचे अस्तित्व आणि त्याची तीव्रता शोधण्याच्या हेतूने हा अभ्यास करण्यात आल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांचे म्हणणे आहे. या अहवालात खोऱ्यातील 156 मुलांचा अभ्यास करण्यात आला आहे. ही मुले २०१० ते २०१५ या काळात दहशतवादी बनले आहेत. या अहवालातील माहिती ही या मुलांच्या कुटुंबियांच्या, मित्रांच्या, शेजाऱ्यांच्या तसेच ओळखीच्या लोकांच्या मुलाखतींच्या आधारे नोंदवण्यात आली आहे.

काश्मीरी दहशतवाद्यांची परंपरांची समज किती आहे तसेच ते यावर किती विचार करु शकतात या बाबींच्या आधारे या अहवालातील माहिती नोंदवण्यात आली आहे. यातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, दहशतवाद्यांची नव्याने करण्यात येणाऱ्या भरतीमध्ये विचारसरणीवर भरती केली जात नाही, कारण यामध्ये दक्षिण काश्मीरमधील अधिक मुलांचा समावेश आहे. या भागात राहणारे लोक टोकाचे मुलतत्ववादी नाहीत.