रामजन्मभूमीबाबतचे पुरावे असणारी कागदपत्रे १९८२मध्ये आखाड्यावर पडलेल्या दरोड्यावेळी चोरीला गेली आहेत, असे स्पष्टीकरण निर्मोही आखाड्याने बुधवारी (दि.७) सुप्रीमो कोर्टात दिले. या पुराव्यांबाबत खंडपीठाने आखाड्याला विचारणा केली होती.

रामजन्म भूमी आणि बाबरी मशीद दरम्यानच्या वादग्रस्त जमिनीबाबत सुप्रीम कोर्टात सध्या नियमित सुनावणी सुरु आहे, या सुनावणीचा आजचा तिसरा दिवस आहे. या प्रकरणात तीन पक्षकारांपैकी एक पक्षकार असलेल्या निर्मोही आखाड्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर आजही आपली बाजू मांडली.

खंडपीठाने निर्मोही आखाड्याच्यावतीने बाजू मांडणारे वकील सुशील जैन यांना विचारले की, राम जन्मभूमीवर तुमचा ताबा असल्याचे तोंडी किंवा लेखी पुरावे, ताब्याची महसूल नोंद वैगरे काही पुरावे तुमच्याकडे आहेत का? यावर आखाड्याने खंडपीठाला सांगितले की, १९८२मध्ये आखाड्यावर पडलेल्या दरोड्यात हे पुरावे चोरीला गेले आहेत. आखाड्याच्या या उत्तरानंतर खंडपीठाने त्यांना दुसरे कोणतेही पुरावे सादर करण्यास सांगितले.

तत्पूर्वी न्या. चंद्रचूड यांनी निर्मोही आखड्याच्या प्रतिनिधींकडे विचारणा केली होती की, आपण कोणत्या आधारावर रामजन्म भूमीवर आपला हक्क सांगत आहात. आपण विनाअधिकार मंदिरात पुजा-अर्चा करु शकता. मात्र, पुजा करणे आणि मालकी हक्क बजावणे या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.

दरम्यान, मंगळवारी निर्मोही आखाड्याच्यावतीने बाजू मांडताना वकील सुशील जैन यांनी कोर्टासमोर सांगितले होते की, १८५०पासून हिंदू समाज या वादग्रस्त जागेवर पूजा-अर्चा करीत आला आहे. उलट, १९४९ नंतर या जागेवर मुस्लिम समाजाकडून नमाज पठण करण्यात आलेले नाही. त्यामुळे या जागेवर मुस्लिम समुदयाने हक्क सांगणे पूर्णपणे चुकीचे आहे.