बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने सडकून टीका केली आहे. असे असतानाच नितीशकुमार यांनी मोदी यांना सात प्रश्न विचारले आहेत. त्यात काळा पैसा भारतात आणण्याचे काय झाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय मार्ग काढला व बिहारला लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता का झाली नाही, या प्रश्नांचा समावेश आहे.
नितीशकुमार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आपण सात प्रश्न उपस्थित करीत आहोत. त्यात बिहारशी निगडित दोन प्रश्न आहेत व त्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यास देशातील लोकांनाही आवडले.
पंतप्रधानांवर टीका करताना ते म्हणाले की, मोदी यांना पंतप्रधान झाल्यानंतर १४ महिन्यांनी बिहारला येण्याची सवड झाली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असा टोला लगावला आहे. आता त्यांच्याकडून आणखी आश्वासने ऐकण्यास इच्छुक आहोत, पण जुन्या आश्वासनांचे काय झाले हे त्यांनी सांगून टाकावे अशा शब्दांत टोला लगावला आहे.