प्रशांत किशोर यांचे नितीशकुमार यांच्यावर टीकास्त्र

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची संयुक्त जनता दलामधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर भाजपशी जवळीक वाढविण्यावरून आता जोरदार हल्ला चढविला आहे. नितीशकुमार हे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची विचारसरणी आणि गोडसे समर्थकांशी हातमिळवणी करून एकत्रित वाटचाल करू शकत नाहीत, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

संयुक्त जनता दलामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरपासून नितीशकुमार आपल्याला पितृतुल्य आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही, असे प्रशांत किशोर यांनी येथे सांगितले. तथापि, गांधीजींच्या तत्त्वांशी बांधिलकी दर्शवितानाच भाजपशी जवळीक साधण्याच्या त्यांच्या परस्परविरोधी कृतीबद्दल आपले नितीशकुमार यांच्याशी मतभेद असल्याचे किशोर यांनी स्पष्ट केले.

गांधीजी, जयप्रकाश नारायण आणि लोहिया यांची विचारसरणी आपण कधीही सोडू शकत नाही, असे नितीशकुमार नेहमी म्हणतात आणि त्याच वेळी ते गोडसे यांच्या विचारसरणीला समर्थन असलेल्यांशी कशी जवळीक साधू शकतात, या दोन्ही विचारसरणी एकत्र वाटचाल करू शकत नाहीत, जर तुम्हाला भाजपसोबत राहावयाचे असल्यास त्याला हरकत नाही, मात्र तुम्ही दोन्ही बाजूला राहू शकत नाहीत, असे किशोर यांनी म्हटले आहे.

किशोर यांचे अभियान

किशोर यांनी बिहारला देशातील सर्वोत्तम १० राज्यांमध्ये स्थान मिळण्याच्या उद्देशाने ‘बात बिहार की’ या अभियानाची घोषणा केली. या अभियानाची सुरुवात २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. राज्यातील युवा नेतृत्व विकसित करण्यासाठी आपण काम करणार असल्याचे किशोर म्हणाले.

किशोर यांनी राजकारणामध्ये ढवळाढवळ करण्याऐवजी आपला वेळ व्यवसायासाठी घालवावा, त्यांनी आम आदमी पक्षासाठी काम करीत राहावे. – के. सी. त्यागी, जनता दल नेते