देशात अनलॉक २ सुरु झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारतीय जनतेशी संवाद साधला. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नसून यावर मात करण्यासाठी आपल्या सर्वांना अधिक सतर्कता पाळणं गरजेचं असल्याचं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. लॉकडाउनचे चार टप्पे पूर्ण झाल्यानंतर अनलॉकच्या काळात नागरिकांमध्ये निष्काळजीपणा वाढत जात असल्याची खंत पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलून दाखवली.

आणखी वाचा- ३० नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी भारतीयांना मोफत धान्य देणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

लॉकडाउन काळात सोशल डिस्टन्सिंग ते स्वच्छतेपर्यंतचे सर्व नियम आपण पाळत होतो. परंतू गेल्या काही दिवसांमध्ये काही लोकं हे नियम पाळत नसल्याचं पहायला मिळतंय. काही लोकं सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालून जाणं टाळत आहेत. १०० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, त्याला नागरिकांनीही साथ द्यायला हवी. काही दिवसांपूर्वी एका राष्ट्राच्या नेत्याला मास्क न घातल्यामुळे दंड ठोठावण्यात आला. भारतातही आपल्याला अशीच परिस्थिती तयार करायची आहे. गावचा सरपंच असो किंवा देशाचा पंतप्रधान, नियमांच्या पुढे कोणीही मोठं नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी नियम मोडणाऱ्यांना सुनावलं आहे.

आणखी वाचा- अनलॉक १ पासून लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला : पंतप्रधान

यावेळी बोलत असताना मोदींनी पावसाळ्याच्या काळात सर्वांना तब्येतीची अधिक काळजी घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. या काळात सर्दी-खोकला, ताप अशा प्रकारचे आजार सहज बळावतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःची काळजी घेणं गरजेचं असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं. इतर देशांच्या तुलनेत भारतात परिस्थिती बऱ्याच प्रमाणात सांभाळण्यात आलेली आहे, त्यामुळे या प्रादूर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी बेजबाबदारपणे न वागता सरकारला साथ देणं गरजेचं असल्याचं मोदींनी सांगितलं.