पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्याचे आश्वासन पाकिस्तानने दिले आहे त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास दाखवता येणार नाही, असे मत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे.

सिंह यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, पाकिस्तान सरकारने ठोस कारवाईचे आश्वासन दिले आहे, त्यामुळे आपल्याला वाट पाहावी लागेल. त्यांनी आश्वासन दिले असल्याने त्यांच्यावर अविश्वास दाखवता येणार नाही.

पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने असे म्हटले होते की, आम्ही या दहशतवादी कृत्यातील संबंधितांवर कारवाई करता येईल अशी माहिती पाकिस्तानला दिली आहे.

हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे समपदस्थ नवाझ शरीफ यांच्यात दूरध्वनीवर जे बोलणे झाले त्यात पंतप्रधान मोदी यांनी हल्ल्याच्या सूत्रधारांवर पाकिस्तानने ठोस कारवाई करावी असे म्हटले होते. आता आम्ही पाकिस्तान किती वेगाने व किती निर्णायक कारवाई करतो याची वाट पाहात आहोत.

पाकिस्तानात काल सुरक्षा संस्थांना धागेदोरे मिळाले असून त्यांनी त्याच्या मदतीने बहवालपूर जिल्ह्य़ात काही जणांना अटक केली आहे. मौलाना मसूद अझहर याचे मूळ गाव बहवालपूर हे आहे. पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार अझहर हाच होता असे भारताने म्हटले आहे.  दोन्ही देशात १५ जानेवारीला परराष्ट्र सचिव पातळीवर चर्चा व्हायची असेल तर पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्यात ठोस कारवाई करणे अपेक्षित आहे, अशी भूमिका भारताने घेतली आहे.