सेवा करवाढीच्या फटक्याने त्रस्त असलेली जनता आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीने होरपळून निघणार आहे. विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात साडेदहा रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विमानाच्या इंधनाचे दर देखील ७.५ टक्क्यांनी वधारणार आहेत. जागतिक बाजारपेठेत वाढलेल्या किंमतींमुळे सिलिंडर आणि विमान इंधनाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तेल कंपन्यांनी दिली आहे. विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात १०.५० रुपयांची वाढ झाल्याने दिल्लीत आता १४.२ किलोचा सिलिंडर ६२६.५० रुपयांना मिळणार आहे. याआधी १ मे रोजी विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात ५ रुपयांची कपात करण्यात आली होती. यावेळी त्याच्या दुप्पट वाढ करण्यात आली आहे. विमान इंधनाचे दर प्रती किलोलीटर ३,७४४ रुपये एवढी वाढ झाली असून, आता हे दर ५३,३५३ रुपये एवढे झाले आहेत.