उत्तर कोरियाने त्यांचा अणवस्त्र चाचणी तळ नष्ट केला आहे. कोणाच्याही मनात संशय राहू नये यासाठी खास परदेशी पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले होते. गुरुवारी पत्रकारांच्या उपस्थितीत स्फोट घडवून उत्तर कोरियाने त्यांचा अणवस्त्र चाचणी तळ नष्ट केला. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन पुढच्या महिन्यात सिंगापूरमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहे. त्याआधी उचलण्यात आलेले हे महत्वाचे पाऊल आहे.

विविध आर्थिक आणि अन्य निर्बंधांचा सामना करणाऱ्या उत्तर कोरियाने आपल्या आक्रमकतेला लगाम घातली असून कट्टर हाडवैर असलेल्या दक्षिण कोरिया आणि अमेरिकेबरोबर चर्चा सुरु केली आहे. उत्तरपूर्वेला डोंगररांगांमध्ये उत्तर कोरियाचा हा चाचणी तळ होता. उत्तर कोरियाच्या अणवस्त्र चाचण्या संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय होत्या. मागच्या काही वर्षात उत्तर कोरियाने सातत्याने अणवस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचण्या केल्याने जागतिक तणाव निर्माण झाला होता.

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. उत्तर कोरियाकडून सातत्याने अमेरिकेला अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली जात होती. पण आता उत्तर कोरियाने अणवस्त्र चाचणी तळच नष्ट करुन संपूर्ण जगाला सकारात्मक संदेश दिला आहे. उत्तर कोरियाने हा तळ नष्ट करताना आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना निमंत्रण दिले नाही. त्यामुळे संशयाला जागा उरतेच.

मागच्या आठवडयात उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाबरोबर होणारी उच्चस्तरीय बैठक रद्द केली होती. यामागे अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये होणाऱ्या ‘मॅक्स थंडर’ या दोन्ही देशांच्या हवाई दलाचा संयुक्त लष्करी सराव कारण होते.