पैसे नसल्यामुळे आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरून १२ किलोमीटर वाहून नेण्याची दुर्दैवी वेळ ओडिशाच्या दाना माजी यांच्यावर आली होती. मृतदेह खांद्यावरुन नेतानाचा व्हिडिओ गुरुवारी सकाळपासूनच सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी ढिम्म प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच दुसरा दुर्दैवी प्रकार तोही ओडीशामधे समोर आला आहे. रुग्णवाहिकेची सोय न झाल्यामुळे महिलेचा मृहदेह मोडून तो  वाहून नेण्याची वेळ आली. बालासोरा जिल्ह्यात हा प्रकार घडला. येथल्या सलमानी बेहरा या वृद्ध महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते गाठोड्यात बांधून रेल्वे स्टेशनपर्यंत वाहून नेण्यात आले.
रुग्णवाहिकेची सोय होत नव्हती, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेणे आवश्यक होते पण मृतदेह कडक झाला असल्याने त्याला रुग्णालयापर्यंत नेणे शक्य नव्हते म्हणून मृतदेह वाहून नेणा-यांनी तो  कमरेतून मोडला आणि गाठोडे बांधतात तसे त्याला बांधून रेल्वे स्टेशनपर्यंत नेले असेही काहींनी सांगितले. तर मृतदेह रुग्णालयात पोहचवण्यासाठी  स्थानिकांनी जास्त रकमेची मागणी केली होती, पण जे कमी पैशात हे काम करण्यास तयार झाले त्यांनी हा मृतदेह कडक झाल्यामुळे त्याचे तुकडे केले असल्याची प्रतिक्रिया रेल्वे पोलिसचे अधिकारी प्रताव रुद्र मिश्रा यांनी दिली. राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मृतदेह वाहून नेण्यासाठी महापरायण योजनेअर्तंगत मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु केल्या आहे. पण असे प्रकर पाहता अशा योजना गांभीर्याने राबवले जात नसल्याचे समोर येत आहे.