श्रीनगर : भाजप, त्यांचे घटक पक्ष आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाने जिल्हा विकास परिषदांच्या (डीडीसी) निवडणुकांचे निकाल स्वीकारावे आणि लोकशाहीची बदनामी टाळण्यासाठी घोडेबाजार थांबवावा, असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी येथे सांगितले.

डीडीसी निवडणुकांमध्ये नव्याने निवडून आलेल्यांना विकत घेण्यासाठी अपनी पार्टी आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन जबरदस्ती करीत असल्याचा आरोपही अब्दुल्ला यांनी केला आहे. शोपियन जिल्ह्य़ातील काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या काही विजयी उमेदवारांना श्रीनगर येथे आणण्यात आले असून त्यांच्यावर अपनी पार्टीमध्ये प्रवेश करण्याची जबरदस्ती केली जात आहे, असेही ओमर अब्दुल्ला यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. अब्दुल्ला यांनी आपल्या आरोपांच्या पुष्टय़र्थ दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणाची फीत वाजवून दाखविली. नॅशनल कॉन्फरन्सच्या विजयी महिला उमेदवाराने अल्ताफ बुखारी यांच्या अपनी पार्टीमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्या पतीच्या भावाची तीन दिवसांत सुटका केली जाईल, असे आश्वासन या महिला उमेदवाराच्या पतीला देण्यात आल्याचे संभाषणावरून स्पष्ट होत आहे.