भारतीय लष्करामधील एका जवानालाही करोना विषाणू संसर्ग झालेल्याचे समोर आले आहे. सैन्यातील जवानांना या आजाराची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. लेहमध्ये हा जवान तैनात असून तो २५ फेब्रुवारीपासून १ मार्चपर्यंत सुट्टीवर होता. या काळातच त्या या विषाणूचा संसर्ग झाला आहे. या जवानाचे वडील इराणहून धार्मिक यात्रेवरुन परतले आहेत.

या जवानाला करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येताच त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबियांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. इराणहून परतलेल्या या जवानाच्या वडिलांची करोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे.

नवा संसर्गजन्य आजार असलेल्या करोनाग्रस्तांचा देशातील आकडा १३८वर पोहोचला आहे. याचा संसर्ग वाढतच चालल्याने सरकारने कठोर निर्णय घेत देशाच्या सीमा सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तपासणीशिवाय देशात प्रवेश करता येणार नाही.

दरम्यान, इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) मंगळवारी सांगितले की, भारत सध्या करोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसऱ्या स्टेजवर आहे. अद्याप तिसऱ्या स्टेजवर आपण पोहोचलेलो नाही. या विषाणूग्रस्त रुग्णांच्या चाचण्यांसाठी आयसीएमआरच्या देशभरात ७२ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या आठवड्यात देशात ४९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

जगभरात १,८७,६८९ जणांना या विषाणूची लागण झाली असून यामध्ये मंगळवारपर्यंत ७८६६ जणांचा मृत्यू झाला आहे.