संसदेत दोन आठवडय़ांपासून गाजत असलेल्या धर्मातराच्या मुद्दय़ावर विरोधकांची केवळ प्रसारमाध्यमांमध्ये ओरड सुरू आहे. यावर गांभीर्याने चर्चा करण्यास ते तयार नाहीत. राज्यसभेत विरोधी पक्षाचे सदस्य गोंधळ माजवून कामकाज बंद पाडत आहेत, असा आरोप केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी रविवारी येथे केला.
लोकसभेचे कामकाज सुरू आहे, पण राज्यसभेचे का नाही? कारण आम्ही धर्मातरावर चर्चा करण्यास तयार आहोत. परंतु राज्यसभेत काँग्रेस, जनता दल (युनायटेड), भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी यांना यावर चर्चाच नको आहे. कारण त्यांना ठाऊक आहे की, या चर्चेत त्यांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे, असे प्रसाद पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
राज्यसभेतील विरोधकांकडून गोंधळ घालून कामकाज बंद पाडणे हे दुर्दैवी आहे. विरोधक सभागृहाचे कामकाज बंद पाडण्यात गुंतले आहेत आणि त्यांना तेच हवे आहे, असा आरोपही प्रसाद यांनी या वेळी केला. सक्तीने घडवून आणलेले धर्मातर भाजपला मान्य नाही आणि देशात कुठे असा प्रकार घडत असेल तर आपला पक्ष त्या विरोधात उभा राहिल.

‘देशात सलोखा’
सध्या देशात शांतता आणि सलोख्याचे वातावरण आहे. परंतु विरोधकांचा त्यावर विश्वास नाही. उत्तर प्रदेशात जेव्हा १०० हून अधिक दंगली घडतात, तेव्हा विरोधकांचा आवाज बंद असतो. मुझफ्फरनगरात जेव्हा जातीय दंगली पेटल्या. लोक मारले गेले. मात्र त्यावर विरोधकांना चर्चा नको आहे, असा टोला प्रसाद यांनी लगावला.

‘विकासापासून ढळणार नाही’
चेन्नई: वादग्रस्त धर्मातराच्या घटनांमुळे भाजपप्रणीत रालोआ सरकार विकासाच्या अजेंडय़ापासून दूर जाणार नाही, असे भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, सरकारला त्याच्या विकासाच्या कार्यक्रमापासून कुणीही दूर नेऊ शकत नाही. सक्तीच्या धर्मातराबाबत भूमिका स्पष्ट आहे आणि त्यावर बंदी घालण्यासाठी कायदा करण्यासाठी सरकार तयार आहे.