करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या पीएम केअर फंडात पाच दिवसांत ३०७६ कोटी रुपये जमा झाले आहेत. केंद्र सरकारकडून ऑडिट रिपोर्टमध्ये यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. २७ मार्च रोजी पीएम केअर फंडची सुरुवात करण्यात आली होती. २०२० आर्थिक वर्षासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये २७ मार्च ते ३१ मार्चमधील माहिती देण्यात आली आहे.

३०७६ कोटींमधील ३०७५ कोटी ऐच्छिक योगदानातून आले असून ३९ कोची ६७ लाख रुपये परदेशातून मिळालेलं योगदान आहे. रिपोर्टनुसार, पीएम केअर फंडात सुरुवातीला मिळालेला २ लाख २५ हजारांचा निधी होता, तसंच ३५ लाखांचं व्याज जमा झालं. पीएम-केअर फंड वेबसाईटवर ऑडिट रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र यावेळी फंडात योगदान देणाऱ्या स्थानिक तसंच परदेशी देणगीदारांची माहिती सरकारने सार्वजनिक केलेली नाही.

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी देणगीदारांची नावं जाहीर का करण्यात आलेली नाहीत यासंबंधी विचारणा केली आहे. प्रत्येक समाजसेवी संस्था, विश्वस्त मंडळाला देणगीदारांची नावं जाहीर करणं अनिवार्य असताना पीएम केअर फंडाला यामधून मुभा का देण्यात आली आहे ? अशी विचारणा पी चिदंबरम यांनी केली आहे.

विश्वस्तांना देणगीदारांची नावं जाहीर करण्यात कसली भीती वाटत आहे ? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

करोनासारख्या संकटांचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात पीएम केअर फंडची स्थापना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख असणाऱ्या विश्वस्त मंडळाकडे याची जबाबदारी आहे. अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री विश्वस्त आहेत.