काश्मीर प्रश्नी चीन पाकिस्तानला मदत करीत असल्याची कबूली खुद्द पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेज बाजवा यांनी दिली आहे. काश्मीरच्या मुद्द्यासह अणू पुरवठा गट आणि शांघाई सहकार्य संघटनेतील विस्तारासाठी पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही चीनचे ऋणी आहोत, असे बाजवा यांनी म्हटले आहे. चीन दुतावासाकडून रावळपिंडी येथे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

बावजा म्हणाले, काश्मीर खोऱ्यात चीन आणि पाकिस्तान यांची ताकद महत्वपूर्ण आहे. दोन्ही देशांच्या चांगल्या द्वीपक्षीय संबंधांमुळे दोन्ही देशांचा फायदा झाला आहे. परस्पर विश्वास, सन्मान, समजूतदारपणा तसेच सहकार्यावर आधारित संबंध यामुळे हे शक्य झाले आहे, खरंतरं ही मैत्री आता प्रत्येक दिवसागणिक वाढतच असल्याचे ते म्हणाले. चीनने अणू पुरवठा गट, काश्मिर मुद्दा, शांघाई सहकार्य संघटन यांमध्ये पाकिस्तानच्या पूर्ण सदस्यत्वासाठी त्याचबरोबर सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपल्या सक्रीय पाठींबा दिल्याने त्यांनी चीनचे आभारही मानले.

मात्र, चीन कायमच भारताच्या महत्वपूर्ण कामांमध्ये काही ना काही कारणाने अडथळे आणण्याचे काम करीत आला आहे. चीनने नेहमीच भारताच्या अणु पुरवठा गटात (एनएसजी) स्थान मिळवण्याच्या प्रयत्नांत अडथळे आणले आहेत. या विरोधासाठी चीनचे म्हणणे आहे की, पाकिस्तानला देखील एलीट न्यूक्लियर ट्रेडिंग गटात समावेश द्यायला हवा. त्याचबरोबर चीनने भारताकडून जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याच्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून बंदी आणण्याच्या प्रयत्नांमध्येही अनेकदा अडथळे आणले आहेत.