केंद्राच्या लसखरेदी धोरणावर केजरीवाल यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली : ‘करोनाचे युद्ध केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे लढले पाहिजे. पण, लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर सोपवून केंद्र नामानिराळे झाले आहे. पाकिस्तानने देशावर हल्ला केला तर, राज्यांनी लढायचे का? दिल्लीने बॉम्ब बनवायचे, युद्धसामग्री खरेदी करायची? उत्तर प्रदेशने तोफा खरेदी करायच्या?’, असा सवाल करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केंद्राच्या लसखरेदी धोरणावर तीव्र टीका केली.

‘दिल्लीत लशींअभावी शनिवारपासून १८-४५ वयोगटाचे लसीकरण स्थगित करावे लागले. दिल्लीतच नव्हे, देशभर अनेक लसीकरण केंद्रे बंद करावी लागत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी नवी केंद्रे सुरू करण्याची गरज असताना अस्तित्वात असलेली लसीकरण केंद्रेदेखील बंद करावी लागत आहेत’, असा शाब्दिक हल्ला केजरीवाल यांनी केला. दिल्ली सरकारकडून मॉडर्ना व फायझर या परदेशी लस कंपन्यांशी संपर्क साधून लसखरेदीचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर, दिल्ली सरकार गेल्या दोन दिवसांपासून केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या धोरणाविरोधात आक्रमक झाले आहे.

‘जागतिक निविदांना प्रतिसाद मिळत नाही आणि परदेशी कंपन्या राज्यांना लस देण्यास तयार नसतील तर, राज्यांनी काय करायचे’, असा सवाल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला होता. त्यानंतर, आता केजरीवाल यांनीही केंद्रावर टीकास्त्र सोडले आहे.

‘दिल्लीला स्पुटनिक लस’

दरम्यान, रशियन बनावटीची स्पुटनिक लस दिल्लीला मिळणार असून यासंदर्भात दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी लसउत्पादकांशी चर्चा केली. मात्र, नेमक्या किती लसमात्रा दिल्लीला मिळतील हे निश्चित झालेले नाही, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.

तर जीव वाचले असते!

‘एकही राज्य आत्तापर्यंत स्वतंत्रपणे लशींची एक मात्राही खरेदी करू शकलेले नाही. लसकंपन्यांनी राज्यांशी बोलणी करण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. ही वेळ केंद्र व राज्य दोघांनी ‘टीम इंडिया’ बनून काम करण्याची आहे. राज्यांना लस पुरवण्याची जबाबदारी केंद्राचीच आहे. देशात करोनाची दुसरी लाट मार्चमध्ये आली तेव्हा केंद्र सरकारने परदेशी कंपन्यांकडून, जिथे मिळेल तिथून लसखरेदी करायला हवी होती. इतर देशांच्या तुलनेत भारताने लसीकरणालाही सहा महिने उशीर केला. पहिली लस भारतात भारतीयांनी बनवली. खरेतर आत्तापर्यंत आपण अधिकाधिक लशींचे उत्पादन करून साठा करायला हवा होता. तसे झाले असते तर दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांचे जीव वाचले असते’, असा प्रश्न करत केजरीवाल यांनी करोना रुग्णांच्या मृत्यूला केंद्र जबाबदार असल्याची अप्रत्यक्ष टीका केली.

राजधानीत संसर्गदर २ टक्क्यांपेक्षा कमी

दरम्यान, दिल्लीतील करोनाचा संसर्गदर दोन महिन्यानंतर २ टक्क्यांपेक्षा कमी, १.९३ टक्क्यांवर आला आहे. गेल्या आठवड्यात तो पाच टक्क्यांपर्यंत खाली आला होता. एप्रिलच्या मध्यात दिल्लीतील संसर्गदर ३२ टक्क्यांवर पोहोचला होता. गेल्या चोवीस तासांमध्ये दिल्लीत १,४९१ नव्या रुग्णांची भर पडली असून १३० मृत्यू झाले.