पाकिस्तानातील निवडणुकीत मतदारांनी तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांच्या पक्षाला भरभरून मते दिली आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याच्या पक्षाला घरचा रस्ता दाखविला. त्यामुळे पाकिस्तानात सत्तेवर येऊ पाहणाऱ्या दहशतवाद्यांच्या पक्षाला मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. या संदर्भात भारताचे केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी मत व्यक्त केले आहे.

हाफिज सईदचा पाठिंबा असलेल्या अल्लाहू अकबर तेहरिक या पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने हाफिज सईदच्या विरोधात म्हणजेच दहशतवादाच्या विरोधात मतदान केले आहे. हाफ़ीजला विजय मिळवून द्यायचा नाही, अशी पाकिस्तानी जनतेची धारणा दिसून आली, असे म्हणत पाकच्या जनतेने दहशतवाद नाकारला असे मत अहिर यांनी व्यक्त केले. तसेच, पाकिस्तनाचे नवनिर्वाचित सरकार भारताशी चांगले आणि सलोख्याचे संबंध प्रस्थापित करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मात्र केंद्रीय राज्यमंत्री आर के सिंग यांनी अहिर यांचे विधान खोदून काढले आहे. ‘ पाकच्या नव्या सरकारचा भारताला काही फायदा होईल असे वाटत नाही. पूर्वीपासून पाकिस्तानमध्ये लष्कराचे प्राबल्य आहे. त्याच्या धोरणांची आखणी लष्करकडून केली जाते आणि तेच या पुढेही होत राहील, असे मत त्यांना व्यक्त केले.