विरोधकांनी नोटाबंदीच्या निर्णयाला केलेल्या विरोधात गोंधळ जास्त आणि तथ्ये कमी होती, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात घेतलेल्या निर्णयावर सरकार ठाम आहे. विरोधकांना फक्त कामकाजात अडथळा आणायचा, त्यांना कोणतीही चर्चा करायची नाही, असेही जेटली यांनी म्हटले आहे.

‘पहिल्या दिवशी नोटाबंदीवर कोणत्याही पूर्व अटीशिवाय चर्चा झाली. त्यानंतर विरोधकांकडून अवाजवी अटी मागण्या करण्यात आल्या,’ असे जेटली यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हटले. ‘जो पक्ष कधीकाळी अनेक घोटाळांमध्ये बरबटला होता, तो पक्ष आज नोटाबंदीला विरोध करतो आहे. ज्यांना कधी घोटाळे ही घोडचूक वाटली नाही, त्यांना आता नोटाबंदीचा निर्णय घोडचूक वाटते आहे,’ असे म्हणत जेटली यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

‘आमची भूमिका स्पष्ट आहे. या मुद्यावरुन चर्चा व्हायला हवी,’ असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेच्या गुरुवारच्या सकाळच्या सत्रानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. विरोधी पक्षातील मनमोहन सिंग, डेरेक ओब्रायन आणि नरेश अगरवाल यांनी नोटाबंदीचा निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीवरुन सरकारला धारेवर धरल्यानंतर जेटली यांनी सावध प्रतिक्रिया दिली होती.

गुरुवारी सकाळी राज्यसभेत मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीवरुन अभ्यासपूर्ण भाषण केले. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे व्यवस्थापन चुकले असल्याचे मनमोहन यांनी म्हटले. सरकारचा हा निर्णय म्हणजे संघटित लूट असल्याची मनमोहन सिंह यांनी केली. सामान्य माणूस, शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या निर्णयावरुन माजी पंतप्रधानांनी सरकारला धारेवर धरले.

मनमोहन सिंग यांच्या नोटाबंदीवरील अभ्यासपूर्ण भाषणानंतर तृणमूल काँग्रेसच्या डेरेक ओब्रायन यांनी सरकारवर निशाणा साधला. सामान्य माणासाला होणाऱ्या त्रासाबद्दल सरकारने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ओब्रायन यांनी केली.

‘ही अहंकाराची लढाई नाही. आपल्याला यातून मार्ग काढावा लागेल. तुम्ही ५ दिवसानंतर इथे आलात ही चांगली गोष्ट आहे. मी मानवतेच्या दृष्टीकोनातून मोदींना आवाहन करतो. लोकांना त्रास होतो आहे. आमच्या सूचनांचा त्यांना स्वीकार करावा,’ असे ओब्रायन यांनी म्हटले.