नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये विविध विषयांवरही चर्चा झाली. या भेटीनंतर पत्रकारांनी त्यांना अर्थव्यवस्थेबाबत केलेल्या टिपण्णीविषयी प्रश्न विचारला. या प्रश्नाला त्यांनी अंत्यंत हुशारीने उत्तर दिले.

नवी दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत बॅनर्जी यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या आपल्या भेटीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, पंतप्रधानांसोबतची भेट खूपच चांगली होती. मी तुमच्या जाळ्यात अडकणार नाही. कारण, पंतप्रधानांनी मला सावध केले आहे. मोदींचा सावधानतेचा हा विनोदी किस्सा सांगताना ते म्हणाले, पंतप्रधानांनी मला सुरुवातीलाच सांगितले की, माध्यमं तुम्हाला मोदीविरोधात विधानं करायला भाग पाडतील.

बॅनर्जी म्हणाले, “पंतप्रधान मोदी टीव्ही पाहतात आणि त्यांचे सर्व गोष्टींवर लक्ष असते. ते सध्या टीव्ही पाहत आहेत आणि तुम्हालाही पाहत आहेत. त्यांना हे माहिती आहे की, आपण आता मला काय विचारणार आहात. यावेळी बॅनर्जींना पत्रकार त्यांच्या अर्थव्यवस्थेवरील सुस्तीबाबतच्या विधानावर प्रश्न विचारत होते. मात्र, त्यांनी पत्रकारांचा हा प्रश्न मध्येच थांबवत म्हटले की, पंतप्रधानांना माहिती आहे की माध्यमं माझ्याकडून काय वदवून घेणार आहेत.