पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा ते तिथल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित करतात. दोन दिवसांच्या स्वीडन दौऱ्यावर गेलेल्या मोदींनी मंगळवारी रात्री स्टॉकहोल्म विद्यापीठात भारतीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली भारत कसा वेगाने प्रगती करतोय ते परदेशस्थ भारतीयांना सांगितले. माझे आणि माझ्याबरोबर आलेल्या शिष्टमंडळाचे तुम्ही ज्या प्रेमाने, आत्मीयतेने स्वागत केले त्याबद्दल मी स्वीडनचे राजे, पंतप्रधान आणि जनतेचे आभार मानतो असे मोदी भाषणाच्या आरंभी म्हणाले.

आपली भाषा, परिस्थिती वेगळी असू शकते पण एक गोष्ट आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवते ती म्हणजे आपण सर्व भारतीय आहोत. आफ्रिका असो वा पॅसिफिक क्षेत्रातील छोटासा देश किंवा आशियाई, युरोपियन देश असोत ते आज भारताकडे विश्वासू मित्र म्हणून पाहतात. मोदींनी यावेळी त्यांच्या सरकारची उज्वला योजना कशी यशस्वी ठरली ते सुद्धा सांगितले. तुम्हाला भारत सोडून बरीच वर्ष झाली असतील, तुम्हाला आठवत असेल एलपीजी गॅस सिलिंडर घरी कधी येणार त्याची वाट पाहावी लागायची. पण आता पुरवठादार स्वत: फोन करुन विचारतात, सिलिंडर कधी आणून पोहोचवू.

आपले सरकार देशामध्ये अमूलाग्र परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारकडून सुरु असलेले कार्यक्रम या सुधारणा नसून ते परिवर्तन आहे. आमच्या समोरचा रस्ता खूप मोठा आहे. पण जिथे पोहोचायचेय ते ठिकाण दुष्टीपथात आहे तसेच आमचा निर्धारी पक्का आहे असे मोदींनी सांगितले.

स्वीडनमध्ये भारताचा एकच दूतावास आहे. पण राजदूत फक्त एक नसून अनेक आहेत. स्वीडनमधला प्रत्येक भारतीय आमचा राजदूत आहे असे मोदी म्हणाले. व्यापार, संशोधन आणि गुंतवणुकीसाठी भारतात या. आम्ही तुमची वाट पाहत आहोत असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. दरम्यान स्वीडनचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनमध्ये दाखल झाले आहेत. लंडनच्या हिथ्रो विमानतळावर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री बोरीस जॉन्सन यांनी त्यांचे स्वागत केले.