भारतीय अर्थव्यवस्था ही झपाट्याने वाढत आहे आणि अनेक परदेशी गुंतवणुकदारांसाठी भारत लोकप्रिय ठिकाण ठरत आहे. मात्र, ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी भविष्यातदेखील आर्थिक सुधारणा प्रामाणिकपणे राबविल्या गेल्या पाहिजेत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते शनिवारी दिल्लीत भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘अॅडव्हानसिंग एशिया’ या कार्यक्रमात बोलत होते. परिवर्तनात्मक सुधारणा हा माझा उद्देश असून तो सफल होणे बाकी असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.
यावेळी मोदींनी जागतिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्यादृष्टीने भारत हा आशेचा किरण असल्याचे मत व्यक्त केले. २१ वे शतक हे आशियाचे असेल असे भाकित असे भाकित अनेक तज्ज्ञांनी वर्तविले आहे. यामध्ये भारताचे स्थान विशेष असेल, असे मोदींनी यावेळी म्हटले. लोकशाही आणि जलद आर्थिक विकास या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकत नाहीत, हा समजुत भारताने खोटा ठरवला आहे. एखाद्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशात आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक स्थिरता नांदू शकते, हे भारताने जगाला दाखवून दिल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.