माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या डोक्यावर वेगवेगळ्या प्रकारची पगडी घालतात मग मुस्लिम बांधवांची टोपी का नाकारतात? असा प्रश्न विचारत शशी थरूर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच या प्रश्नाचे उत्तर द्यावे अशीही मागणी थरूर यांनी केली आहे. तिरूवनंतपुरममध्ये ‘नफरत के खिलाफ : वर्तमान भारत में हिंसा और सहनशीलता’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात त्यांनी ही भूमिका मांडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा विविध राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये जातात तेव्हा तिथल्या संस्कृतीप्रमाणे पेहराव किंवा पोशाख करतात हे आपण सगळ्यांनी पाहिले आहे. मग त्यांना हिरवा रंग का आवडत नाही? तसेच मुस्लिम बांधवांची टोपी घालण्यात काय अडचण आहे? असे शशी थरूर यांनी विचारले आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी स्वामी अग्निवेश यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही त्यांनी निषेध नोंदवला आहे. स्वामी विवेकानंद आज असते तर कदाचित त्यांच्यावरही हल्ला झाला असता अशीही टीका थरूर यांनी केली.

याआधी २३ जुलैला शशी थरूर यांनी देशात माणसापेक्षा गायी सुरक्षित आहेत म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधानांच्या विरोधात वक्तव्य केले आहे. २०१४ च्या आधी झालेल्या एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी गेले होते. त्यामध्ये त्यांनी इमामाकडून टोपी घालणे नाकारले होते. हा व्हिडिओ २०१४ च्या निवडणुकांच्या वेळीही व्हायरल झाला होता. याच व्हिडिओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शशी थरूर यांनी निशाणा साधला आहे.