पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं. या अधिवेशनात दोन प्रश्न विचारले गेले. पहिला प्रश्न विचारला गेला तो स्थलांतरित मजुरांबाबत. या देशात किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला. त्याचं उत्तर माहित नाही असं देण्यात आलं. तसंच ज्या डॉक्टरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाळ्या, टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं त्यांच्यापैकी किती जणांचा करोनामुळे मृत्यू झाला? या प्रश्नाचं उत्तरही सरकारने माहित नाही असंच दिलं. त्यावरुनच प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

मोदी सरकारला किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला हे ठाऊक नाही. तसंच ज्या डॉक्टरांना करोना योद्धे अशी उपमा देऊन त्यांच्यासाठी थाळीनाद आणि टाळ्या वाजवण्याचं आवाहन मोदींनी केलं होतं त्या डॉक्टरांपैकी किती डॉक्टरांचा करोनाने मृत्यू झाला याचीही माहिती मोदी सरकारकडे नाही. अशा स्वार्थी नेत्याचा आम्ही निषेध करतो. अशा स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.