देश सध्या करोनाच्या संकटाचा मुकाबला करत असून, अनेक नवे प्रश्न या महामारीमुळे निर्माण झाले आहेत. चार लॉकडाउननंतर केंद्र सरकारनं हळूहळू बंधन शिथील करण्यास सुरूवात केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, “भविष्यात जेव्हा करोनाविरोधातील भारताच्या लढाईकडे बघितलं जाईल. त्यावेळी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कसं काम केलं म्हणून या काळाकडे बघितलं जाईल. सहकार संघराज्याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे,” असं मोदी यांनी सांगितलं.

केंद्र सरकारनं करोनातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी अनलॉक १ जाहीर करत बंधन शिथिल करण्यास सुरूवात केली आहे. अनलॉक १ जाहीर होऊन दोन आठवडे लोटले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पार्श्वभूमीवर २१ राज्य व केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. “अनलॉक एक जाहीर करून दोन आठवडे झाले आहेत. या काळात जे अनुभव आले, त्यांची समीक्षा व चर्चा करणं पुढील काळासाठी उपयोगी ठरणार आहे. आजच्या या चर्चेत मला तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी समजून घेता आल्या. स्थानिक पातळीवरील स्थिती समजून घेण्याची संधी मिळाली. आजच्या चर्चेत जे मुद्दे आणि सूचना समोर आल्या आहेत. त्यांची देशाची पुढील रणनीती ठरवण्यात मोठी मदत होणार आहे. भविष्यात जेव्हा करोनाविरोधातील भारताच्या लढाईकडे बघितलं जाईल. त्यावेळी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कसं काम केलं म्हणून या काळाकडे बघितलं जाईल. सहकार संघराज्याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे,” असं मोदी म्हणाले.

आणखी वाचा- भारतात करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ५० टक्के : पंतप्रधान नरेंद्र मोदी

“आपल्या एका गोष्टींची काळजी घ्यायची आहे की, करोनाला जितकं रोखता येईल, त्याचा प्रसार जितका रोखता येईल, तितकीच आपली अर्थव्यवस्था खुली होत जाईल. कार्यालय उघडतील. बाजारपेठा खुल्या होतील. वाहतुकीची साधन सुरू होतील आणि तितक्याच रोजगाराच्या नव्या संधी आपल्यासाठी निर्माण होतील,” असं आवाहन मोदी यांनी केलं.

आणखी वाचा- “लोकांनी आत्मनिर्भर व्हावं असं वाटत असेल, तर त्यांच्या मार्गात आर्थिक अडथळे आणू नका”

“शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं मार्केटिंग करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी नवे पर्याय खुले होतील. त्यांचं उत्पन्न वाढेल व साठवण करण्याच्या सुविधा नसल्यानं शेतकऱ्यांचं जे नुकसान होत होतं, तेही आपण कमी करू शकू,” असं मोदी म्हणाले.