पंडित जसराज यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंडित जसराज यांच्या निधनामुळे मला अतीव दुःख झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. इतकंच नाही तर भारतीय शास्त्रीय संगीत हे त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. शास्त्रीय संगीतातल्या गायकांसाठी ते महान आदर्श ठरले, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही पंडित जसराज यांच्या निधनाच्या वृत्तावर शोक व्यक्त केला आहे. माझ्या सहवेदना या कायम त्यांच्या कुटुंबीयांसोबत असतील. पंडित जसराज यांनी ऐंशी वर्षांपासून संगीत ही एक साधना मानली. आपल्या विविध प्रकारच्या गायनाद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध केलं. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आजच अमेरिकेतल्या न्यू जर्सी या ठिकाणी पंडित जसराज यांचं निधन झालं. पंडित जसराज ९० वर्षांचे होते. त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीत विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. पंडित जसराज हे गेल्या ८ दशकांपासून शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या गायकीने त्यांनी रसिकांची मनं कायमच जिंकली. आपल्या गायकीने एक वेगळं स्थान त्यांनी रसिकांच्या मनात निर्माण केलं होतं. आज एक असा गायक आपल्यातून निघून गेला आहे जो कायम आनंदाची उधळण आपल्या गाण्यातून करत आला. त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्रात, कला विश्वात हळहळ व्यक्त होते आहे.