देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. करोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यादरम्यान, आज (गुरूवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. देशाला संबोधित करताना करोना व्हायरसमुळे देशात निर्माण झालेली परिस्थिती आणि त्याचा सामना करण्यासाठी सरकारनं उचलेली पावलं यावर ते देशवासीयांशी संवाध साधू शकतात.

पंतप्रधान रात्री ८ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजनही केलं होतं. या बैठकीत करोनाचा सामना करण्यासाठी सुरू असलेली प्रयत्न अधिकाधिक वाढवण्यावर चर्चा करण्यात आली.

यादरम्यान त्यांनी सर्व राज्य सरकार, मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ, सैन्यदल, विमान कंपन्या, महापालिका यांच्यासह करोनाचा सामना करण्यासाठी ज्यांचा हातभार लागत आहे, त्यांचे आभार मानले. तर दुसरीकडे सध्या दिल्लीतील गौतम बुद्ध नगर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. नॉएडा परिसरात करोनाचे वाढते रूग्ण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच नागरिकांनी परदेश दौऱ्याची सुचना पोलिसांना देण्याची अॅ़डव्हायझरी जारी करण्यात आली आहे. असं न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

इटलीहून आलेलं कुटुंब रूग्णालयात
ग्रेटर नॉएडाहून एक कुटुंब दिल्लीतील रूग्णालयात दाखल झालं आहे. कुटुंबातील चार सदस्य इटलीहून परतले असून यामध्ये पती, पत्नी, त्यांचा मुलगा आणि मुलगी यांचा समावेश आहे.