लखनौ : गेल्या आठवडय़ात हत्या करण्यात आलेले हिंदू समाज पार्टीचे नेते कमलेश तिवारी यांच्या अंगावर भोसकल्याच्या १५ खुणा व गोळीची जखम होती, असे शवचिकित्सा अहवालात आढळले आहे.

४५ वर्षे वयाचे तिवारी यांच्या चेहऱ्यावर गोळी झाडण्यात आली होती आणि ती त्यांच्या हनुवटीखाली अडकलेली सापडली. त्यांच्या चेहऱ्यावर व मानेवरही अनेक जखमा होत्या, असे या अहवालात नमूद केले आहे.

शवचिकित्सा अहवालात तिवारी यांच्या शरीरावर कापल्याच्या व भोसकल्याच्या १५ जखमा आढळल्या आणि त्यावरून हल्लेखोरांचे क्रौर्य दिसून येते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

तज्ज्ञांच्या मते, हल्लेखोरांनी आधी तिवारी यांच्यावर गोळीबार केल्याचे दिसते. त्यांनी दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असता ती पिस्तुलात अडकली, तेव्हा त्यांनी तिवारींवर चाकू व कुठल्या तरी धारदार शस्त्राने वार केले.

मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तिवारी यांच्या पत्नीला १५ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याशिवाय मृताच्या नातेवाईकांना त्यांनी सितापूर जिल्ह्य़ातील मेहमूदाबाद तालुक्यात एक घरही मंजूर केले असल्याचे राज्य प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अटक करण्यात आलेल्या लोकांवर जलदगती न्यायालयात खटला चालवावा आणि या कटात गुंतलेल्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तिवारी यांच्या खुनाच्या आरोपाखाली गुजरात एटीएसने अश्फाक शेख (३४) व मोइनुद्दीन (२७) या दोघांना मंगळवारी सायंकाळी अटक केली होती.