पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष प्रतापसिंग बाजवा यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमरिंदरसिंग यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बाजवा यांच्या वर्तनामुळे आपल्याविरुद्ध पक्षात तीव्र असंतोष उफाळून आल्याची तक्रार या वेळी अमरिंदर यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
तथापि, अमरिंदरसिंग यांनी बाजवा यांच्याविरुद्ध तक्रार केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमरिंदरसिंग हे बाजवा यांचे कट्टर विरोधक असून अमरिंदरसिंग यांनी त्यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी बाजवा यांना पदावरून हटविणे गरजेचे आहे, असे अमरिंदरसिंग यांनी सोनियांना सांगितल्याचे कळते.