पुलवामा चकमकीत जखमी झालेले ब्रिगेडियर हरदीप सिंह या जिगरबाज अधिकाऱ्याच्या शौर्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. हरदीप सिंह सुट्टीवर होते. पण पुलवामा येथे एका घरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते स्वेच्छेने सुट्टी अर्ध्यावर सोडून परतले व मोहिमेचे नेतृत्व केले अशी माहिती लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लॉन यांनी दिली. सैन्याने कालच्या चकमकीत जैशचा काश्मीर खोऱ्यातील कमांडर कामरान ऊर्फ गाझीचा खात्मा केला.

पुलवामाच्या पिंगलन भागात सोमवारच्या चकमकीत भारतीय सैन्य दलालाही नुकसान सहन करावे लागले. चकमकीच्या वेळी सर्वसामान्य काश्मिरी नागरिकांच्या सुरक्षिततेला पहिले प्राधान्य असल्यामुळे जास्त नुकसान झाले असे लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लॉन यांनी सांगितले. भारतीय सैन्याने जैशचा काश्मीर खोऱ्यातील कमांडर कामरानचा खात्मा केला. पण त्याचवेळी सैन्य दलाची सुद्धा प्राणहानी झाली.

मेजर व्ही. एस. धोंडिअल यांच्यासह चार जवान शहीद झाले. मंगळवारच्या पत्रकार परिषदेत जेव्हा लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लॉन यांना यासंबंधी प्रश्न विचारला त्यावर त्यांनी कमांडर्स स्वत:हा पुढे राहून मोहिमेचे नेतृत्व करत असल्यामुळे जिवीतहानी झाल्याचे सांगितले.कालच्या ऑपरेशनमध्ये नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी आमचे सर्व प्रयत्न सुरु होते. सर्वसामान्य नागरिकांचे प्राण आमच्यासाठी महत्वाचे होते. दहशतवाद्याने केलेल्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला असे ढिल्लॉन म्हणाले.

या चकमकीत मेजर व्ही. एस. धोंडिअल (३३), हवालदार शिवराम (३६) आणि शिपाई हरिसिंग (२६) व अजय कुमार (२७) शहीद झाले, तर चकमकीत सुरक्षा दलाचे नऊ अधिकारी-जवान जखमी झाले. त्यात दक्षिण काश्मीरचे उपपोलीस महासंचालक अमित कुमार यांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.