पंजाबमधील फरिदकोट येथे ६२ वर्षांच्या वृद्धाने अनैतिक संबंधातून मुलाचीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीचे सुनेसोबत अनैतिक संबंध होते आणि यात मुलाचा अडथळा येत होता, म्हणूनच त्याने मुलाचा काटा काढल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे.

फरिदकोट जिल्ह्यातील डाबरी खाना या गावात छोटा सिंह (वय ६२) हा त्याच्या मुलांसह राहतो. छोटा सिंहचा मोठा मुलगा ४० वर्षांचा होता. त्याचे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या दाम्पत्याला मुले देखील आहेत. छोटा सिंहचे मोठ्या सुनेशी प्रेमसंबंध होते. यात मोठा मुलगा अडथळा ठरत होता.

छोटा सिंहने दोन महिन्यांपूर्वी सुनेसाठी फरिदकोट शहर येथे भाड्याने घरही घेतले होते. सुनेशी लग्न करुन या घरात राहायला जाण्याचा निर्णय देखील त्याने घेतला होता. सासरा व सुनेमधील संबंधाची माहिती कुटुंबीयांनी दिली होती. छोटू सिंहच्या पत्नीला याची कुणकुण होती. मात्र, छोटा सिंह कोणाचेही ऐकत नव्हता. मंगळवारी रात्री छोटा सिंहचा मोठा मुलगा घरात झोपला होता. यादरम्यान छोटा सिंहने तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर वार केले. हत्येनंतर त्याने मुलाच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते तुकडे एका मोठ्या पिशवीत भरले. छोटा सिंह ही पिशवी घराबाहेर फेकायला जात असताना लहान मुलाने त्याला पाहिले. पिशवीवर रक्ताचे डाग असल्याने त्याने वडिलांकडे विचारणा केली. यादरम्यान, छोटा सिंहने मोठ्या मुलाची हत्या केल्याचे उघड झाले. कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करत छोटा सिंहला अटक केली आहे.