पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी राष्ट्रध्वजाबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जम्मूतील पीडीपीच्या प्रमुख ३ नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यात राज्यसभेचे माजी सदस्य टी.एस. बाजवा यांचा समावेश आहे.

जम्मू-काश्मीरच्या स्वतंत्र झेंडय़ासह राज्याचा विशेष दर्जा पुन्हा बहाल करेपर्यंत आपण तिरंगा ध्वज हाती घेणार नाही, या मुफ्ती यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाराज झालेले टी.एस. बाजवा माजी प्रदेश सचिव हसन अली वफा आणि माजी आमदार वेद महाजन यांनी राजीनामा दिला आहे. याबाबत या तिघांनी मेहबुवांना दोन पानी पत्र पाठविले आहे. तुमच्या वक्तव्याने आमच्या देशभक्तीपर भावनेला धक्का बसला आहे असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. आमच्या इच्छेविरोधात अनेक घडामोडी घडून देखील आम्ही पक्षाच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिलो. मात्र आव्हानांवर मात करण्याऐवजी काही घटक पक्षाला चुकीच्या मार्गावर नेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अशा प्रकारची देशद्रोही वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असे सांगून भाजपच्या नेत्यांनी मेहबूबा यांच्या या वक्तव्यासाठी त्यांच्यावर टीका केली आहे.

भाजपची श्रीनगरमध्ये ‘तिरंगा यात्रा’

श्रीनगर: काश्मीरचा विलिनीकरण दिवस साजरा करण्यासाठी भाजपच्या काश्मीर शाखेने सोमवारी येथे ‘तिरंगा  यात्रा’ काढली. या मिरवणुकीतील लोकांचा सहभाग हा काश्मीर खोऱ्यात देशद्रोही वक्तव्ये करणाऱ्या लोकांना जोरदार चपराक असल्याचे पक्षाने सांगितले. तत्कालीन जम्मू व काश्मीर संस्थानाने २६ ऑक्टोबर १९४७ रोजी केंद्र सरकारशी विलिनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली होती.