राफेल करारावरुन काँग्रेसने मोदी सरकारची कोंडी करण्याची व्यूहरचना आखली असतानाच आता अनिल धीरुभाई अंबानी समुहाने काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांना नोटीस पाठवली आहे. राफेल कराराबाबाबत निराधार, खोटे आणि बदनामी करणारे विधान केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा समुहाच्या वतीने देण्यात आला आहे.

राफेल युद्ध विमान खरेदीत ४१ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. या करारावरुन मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने सहा जणांची टीम तयार केली असून यात जयवीर शेरगिल यांचा समावेश आहे. ही टीम मोदी सरकारवर राफेल करारावरुन हल्लाबोल करणार आहे.

या पार्श्वभूमीवर अनिल धीरुभाई अंबानी समूहाने जयवीर शेरगिल यांना नोटीस पाठवली आहे. ‘नेता म्हणून तुम्ही राजकीय मुद्द्यांवर भाष्य करु शकता. वादविवाद किंवा चर्चासत्रात तुमचे मत मांडू शकता. तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा आमचा प्रयत्न नाही. पण तुमच्या पक्षातील अशोक चव्हाण, रणदीप सुरजेवाला, संजय निरुपम, डॉ. अभिषेक मनू सिंघवी आदी नेते राफेल करारावरुन अनिल धीरुभाई अंबानी समूहावर खोटे आणि निराधार आरोप करत आहे. यातून समूहाची बदनामी केली जात असून त्यांना देखील आम्ही नोटीस पाठवली आहे, असे नोटीशीत म्हटले आहे.

समूहाच्या वतीने कराराबाबतचा तपशील वेळोवेळी जाहीर करण्यात आला आहे. तुम्हाला कराराबाबत काही भूमिका मांडायची असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला पत्रकार परिषेदच्या ४८ तासांपूर्वी त्याची माहिती द्यावी. जेणेकरुन तुम्हाला कंपनीच्या वतीने योग्य ती माहिती पुरवणे शक्य होईल, असे नोटीशीत म्हटले आहे. कंपनीवर निराधार, खोटे आरोप केल्यास आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही नोटीशीद्वारे देण्यात आला आहे.