राफेलप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. संसदेपासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडे ते रिलायन्वर निशाणा साधत आहेत. दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ख्यातनाम वकील कपिल सिब्बल हे न्यायालयात रिलायन्स कम्युनिकेशन लि.चे (आरकॉम) अध्यक्ष अनिल अंबानी यांची मदत करत आहेत. सिब्बल यांनी वकिली हा आपला व्यवसाय असून मी अनिल अंबानी यांची न्यायालयात बाजू मांडत असल्याचे माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मंगळवारी अंबानी टेलिकॉम कंपनी एरिक्सनच्या ५५० कोटी रूपयांच्या थकबाकीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सादर झाले. न्यायालयात सिब्बल यांच्याबरोबर मुकुल रोहतगी यांनीही त्यांची बाजू मांडली. जानेवारी महिन्यात अंबानी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांना ५ आठवड्याच्या आत उत्तर देण्यास सांगण्यात आले होते.
थकबाकी न दिल्यामुळे अंबानी यांच्याविरोधात विशाल गर्ग (एरिक्सन इंडियाचे प्रतिनिधी) अवमानना याचिका दाखल केली होती. आरकॉमने देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या ३ ऑगस्ट २०१८, २३ ऑक्टोबर २०१८ च्या आदेशांचे उल्लंघन केल्याचे त्यांचे मत आहे. न्यायालयाने या आदेशात अंबानी यांच्या कंपनीला ५५० कोटी रूपयांची थकबाकी एरिक्सनला परत देण्यास सांगितले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 12, 2019 6:51 pm