आज लोकसभेत महागाईच्या मुद्द्यांवर बोलताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली. आतापर्यंत महागाईवर मोदी फक्त बोलतच होते. काम काहीच केलं नाही, आता महागाई नेमकी कधी कमी होणार याची तारीखच सांगा असे ते यावेळी म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये निवडणूकांच्या दरम्यान भाषण करताना तुम्ही स्वतःला चौकीदार बोलला होता, पण आता त्याच चौकीदाराच्या नाकाखालून डाळीची चोरी होत आहे. याला नक्की काय म्हणाल. टॉमेटो, बटाटा, डाळी या आवश्यक गोष्टींही सर्वसामान्य माणसाला परवडत नाहीयेत. मोदी सरकारच्या काळात १३० टक्क्यांनी महागाई वाढली असा आरोप यावेळी राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला.
एवढेच बोलून ते थांबले नाहीत. आपल्या भाषणात ते पूढे म्हणाले, “मोदींना स्टार्ट अप इंडिया, मेक-इन इंडिया यांवर बोलायला वेळ आहे. पण, महागाईवर बोलायला वेळच नाही.” एनडीएच्या राज्यात मोठ्या उद्योगपतींना फायदा झाला. पण, गरिब शेतकऱ्यांना नाही असेही ते पुढे म्हणाले. भाषणाच्या शेवटी त्यांनी सांगितले की, प्रत्येक गावात आता लहान मुलं अरहर मोदी, अरहर मोदी असे नारे देताना ऐकू येत आहेत.