चीन सीमेवर पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्यानं टीका केली आहे. आता राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचे नावच बदलून हे तर खरे ‘सरेंडर मोदी’ असल्याची टीका टि्वटरवर केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर आता काँग्रेस विरुद्ध भाजपा असा शाब्दिक वॉर सुरू झाला आहे.

राहुल गांधी यांनी शनिवारीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. चीनच्या आक्रमणापुढे पंतप्रधानांनी भारतीय भूमी सरेंडर केली अशी टीका त्यांनी टि्वटरवर केली होती. शिवाय त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले होते. त्यांनी टि्वटमध्ये म्हटले होते की, “जर ती जमीन चीनची होती तर, भारतीय जवान का शहीद झाले? आणि ते कोठे शहीद झाले?”

भाजपानं दिलं उत्तर
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनीही राहुल गांधी यांच्या टि्वटला उत्तर दिलं. ते म्हणाले की, “राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ज्या अपमानास्पद शब्दांचा वापर करत आहेत, तसा वापर शत्रू राष्ट्रातील नेतेही करत नाहीत. राहुल गांधी सातत्यानं पंतप्रधान आणि देशाचा अपमान करत आहेत.”

स्पेलिंगवरून ट्रोल
राहुल गांधी यांनी सरेंडरच्या स्पेलिंगमध्ये चूक केल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलंय. त्यावरून त्यांना आता ट्रोलही केलं जात आहे.