प्रियंका गांधी यांना काँग्रेसने अखेर मैदानात उतरवलं असून नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अनेकांनी प्रियंका गांधी यांचं स्वागत केलं असून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही त्या एक चांगल्या महिला असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी प्रियंका गांधींची मदत घेत आहेत, ही एक चांगली गोष्ट असल्याचंही सांगितलं.

‘प्रियंका गांधी एक चांगल्या महिला आहेत. राहुल गांधी यांनी आपण एकटे राजकारण करु शकत नसल्याचं मान्य केलं आहे आणि त्यासाठी ते प्रियंका गांधींची मदत घेत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे’, असं सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे.

प्रियंका गांधी यांच्या राजकारणात प्रवेशानंतर काँग्रेसमधील लहान-थोरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उत्तर प्रदेशात मोदी-शहाला शह देण्यासाठीच काँग्रेसने ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रियंका आल्यामुळे आता मोदीमुक्त वाराणसी आणि योगीमुक्त गोरखपूर होणार असल्याचे म्हणत या दोन मतदारसंघातून प्रियंका निवडणूक लढवणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

काँग्रेसने बुधवारी अचानक प्रियंका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने प्रियंका गांधींना निवडणूकीच्या रणांगणात उतरवल्याने ही निवडणूक रंजक होणार असल्याचे बोलले जात आहे. राजकीय वर्तुळातून प्रियंका यांच्या राजकीय प्रवेशावरुन अनेक आडाखेही बांधले जात आहेत. माध्यमांनी तर प्रियंका यांच्या निवडीला काँग्रेसचे ब्रह्मास्त्र असे संबोधले आहे.

प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाचा काँग्रेसला काय लाभ होणार यावर एक नजर टाकूयात..
१. प्रियंका गांधी यांच्या काँग्रेस प्रवेशाने सर्वच उत्तर प्रदेशातील राजकारणाची दिशा बदलणार असून, लोकसभा निवडणुकीत हा निर्णय चित्र पालटणारा ठरणार आहे. समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष यांनी काँग्रेसला आघाडीत घेण्यास नाकारले होते, त्यामुळे काँग्रेसच्या जागा कमी होण्याची शक्यताही होती.

२. प्रियंका गांधी यांचा अमेठी व रायबरेली मतदारसंघात मोठा प्रभाव असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली होती. यापूर्वीही अनेकदा प्रियंका सक्रिय राजकारणात उतरण्याच्या चर्चा होत्या.

३. प्रियंका गांधी पुढील महिन्यात पदाची सूत्रे घेणार असून, त्यापूर्वी त्या उत्तर प्रदेशातील नेत्यांशी दिल्लीत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. त्यात सप-बसपा युतीमुळे होणाऱ्या परिणामांचा विचार केला जाईल.

४. काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेनुसार पूर्व उत्तर प्रदेशातील ४० लोकसभा मतदारसंघांसाठी प्रियंका यांची करण्यात आलेली नेमणूक लाभदायी ठरणार आहे. कारण त्यांच्याकडे करिष्मा आहे. या ४० मतदारसंघांत पंतप्रधान मोदी यांचा वाराणसी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर मतदारसंघही येतो.

५. पूर्व उत्तर प्रदेशातील सध्याचे अनेक केंद्रीयमंत्री निवडून आलेले आहेत, त्यांची घोडदौड रोखण्याचा हा प्रयत्न आहे. राहुल यांचा अमेठी व सोनियांचा रायबरेली मतदारसंघही यात येतो.

६. रायबरेलीतून सोनिया गांधी यांच्याऐवजी प्रियंका गांधी यांना लोकसभा निवडणुकीसाठी उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

७. पूर्व उत्तर प्रदेशातील फुलपूरमधून यापूर्वी जवाहरलाल नेहरू व विजयालक्ष्मी पंडित हे निवडून आले होते. काँग्रेसला १९८४ च्या लोकसभा निवडणुकीपासून ही जागा जिंकता आलेली नाही. २०१८च्या पोटनिवडणुकीत ही जागा समाजवादी पक्षाने बसपाच्या पाठिंब्यावर जिंकली होती.

८. प्रियंका गांधी या पहिल्यांदाच संघटनात्मक पद घेत आहेत. त्यांनी याआधी अनेकदा उत्तर प्रदेशला भेट दिली होती, पण ती रायबरेली व अमेठीपुरती मर्यादित होती. तेथे लोक त्यांना गांधी कुटुंबाची कन्या म्हणून ओळखतात.

९. नेहरू-गांधी घराण्यासाठी लोकांच्या मनात जी सदिच्छा आहे त्याचा चांगला फायदा प्रियंका उठवू शकतात असे काँग्रेसला वाटते. प्रियंका या अमेठी व रायबरेली शिवाय इतरत्रही प्रभावी प्रचारक म्हणून प्रचार सभा घेणार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी या दोन मतदारसंघांत प्रचार केला होता. नंतर २०१७ च्या विधानसभा निवडणुकांतही त्यांचा प्रचार मर्यादित भागात होता. त्या वेळी सप व काँग्रेस यांची युती करण्यात प्रियंका यांचा मोठा वाटा होता.

१०. प्रियंका आता चाळीस मतदारसंघांत प्रचार करतील व उत्तर प्रदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे हाच संदेश काँग्रेसने यातून दिला आहेत. त्यांच्या प्रचारामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना इतरत्र प्रचार करण्यास वेळ मिळणार आहे. ते केवळ उत्तर प्रदेशात अडकून पडणार नाहीत.

११. प्रियंका गांधी या त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यासारख्याच दिसतात व गर्दी खेचणाऱ्या प्रचारक म्हणून त्या काम करतील. काँग्रेसच्या जुन्या भावनिक आवाहनाला यात महत्त्व दिले असून हे काम प्रियंकाच चांगले करू शकतात.

१२. भाजपा विरोधी सप, बसपा यांनी काँग्रेसला वाळीत टाकले असताना प्रियंका या काँग्रेसला संजीवनी देऊ शकतात. त्यातून देशपातळीवरही काँग्रेसच्या जागा वाढू शकतात.

१३. भाजपाचा मतदार असलेल्या उच्च जातीच्या लोकांना त्या किती प्रमाणात काँग्रेसकडे वळवणार व सप-बसपा युतीचा सामना करताना त्या काँग्रेसच्या जागा वाढवणार का, या दोन मुद्द्यांवर त्यांचे यशापयश ठरणार आहे. गोरखपूर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपाची मते खाल्ल्याने सप-बसपाचा उमेदवार विजयी झाला होता, त्यामुळे मतदारांचा प्रतिसादही यात महत्त्वाचा ठरणार आहे.