काँग्रेस आणि देशातील जनतेच्या दबावामुळेच भाजप सरकारला ‘जीएसटी’त भरघोस कपात करावी लागली, असा दावा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. पण आम्ही यावर समाधानी नाहीत. आम्हाला जीएसटीत कराचे पाच टप्पे नको, आम्हाला करआकारणीसाठी एकच टप्पा हवा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी शनिवारपासून गुजरात दौऱ्यावर असून पहिल्या दिवशी त्यांनी गांधीनगरमधील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. ‘भाजप सरकारने जीएसटीत बदल केले ही बाब स्वागतार्हच आहे. काँग्रेस आणि देशातील जनतेने टाकलेल्या दबावामुळेच सरकारने १७८ उत्पादनांवरील जीएसटीचे प्रमाण २८ वरुन १८ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

आम्ही अजूनही समाधानी नाही, आमचा लढा इथेच संपलेला नाही, भारताला जीएसटीत पाच टप्प्यांऐवजी एकच टप्पा हवा आहे. जीएसटीत अजूनही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. नोटाबंदी आणि गब्बर सिंग टॅक्स (जीएसटी) या दोन निर्णयांनी देशातील लाखो तरुणांना बेरोजगार केल्याचा दावा त्यांनी केला. गांधीनगरमधील सभेपूर्वी त्यांनी अक्षरधाम मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

जीएसटीवरुन काँग्रेसने भाजप सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी यापूर्वीही तिखट शब्दात भाजपचा समाचार घेतला आहे. तर शनिवारी जीएसटीत कपात केल्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी देखील भाजपला चिमटा काढला होता. ‘जीएसटीतील कपातीसाठी मी गुजरातचा आभारी आहे. संसदेला जे जमले नाही ते गुजरातमुळे शक्य झाले’, असे उपरोधिक ट्विट करत त्यांनी भाजपला टोला लगावला होता. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत जीएसटीचा फटका बसेल या भीतीपोटी केंद्र सरकारने जीएसटीत बदल केल्याची चर्चा रंगली आहे.

राहुल गांधी हे तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून शनिवारपासून या दौऱ्याला सुरुवात झाली. या दौऱ्यात ते सहा जिल्ह्यांना भेट देतील. महिला, उद्योजक आणि तरुणांशी ते संवाद साधतील. याशिवाजी अंबाजी मंदिरालाही ते भेट देणार आहेत. शनिवारी त्यांनी एका ढाब्यावर कार्यकर्त्यांसोबत चहा आणि भजीचा आस्वादही घेतला.