पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्यानिमित्ताने ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून दिलेल्या प्रदीर्घ भाषणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल यांनी मौन बाळगणे पसंत केले. आजचा दिवस राजकारणाचा नाही. पंतप्रधानांच्या भाषणावर उद्या बोलू, अशी प्रतिक्रिया राहुल यांनी शनिवारी दिली.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ‘ऑल इंडिया काँग्रेस कमिटी’च्या नवी दिल्लीतील मुख्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी राहुल गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी मंत्री पी.चिदम्बरम, राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद आणि काँग्रेसचे इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. ध्वजरोहणानंतर माध्यमांशी संवाद साधताना सोनिया आणि राहुल या दोघांनीही मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया टाळले. देशात भ्रष्टाचाराबाबत सध्या भरपूर गोष्टी बोलल्या जात आहेत. पण हे एखाद्या आजारी व्यक्तीने दुसऱयांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यासारखे आहे. जे भ्रष्टाचाऱयांची फौज बाळगून आहेत. तेच आज भ्रष्टाचार रोखण्यासाठीचे सल्ले देऊ पाहत आहेत, असे राहुल यावेळी कोणाचेही नाव न घेता म्हणाले.