स्थलांतरित मजुरांसाठी पुढील दहा दिवसांमध्ये आणखी २६०० श्रमिक विशेष रेल्वे सोडल्या जाणार असून ३६ लाख मजूर आपापल्या गावी जाऊ शकतील, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. पण  पाऊण तासाच्या या पत्रकार परिषदेत यादव यांना रेल्वेच्या कारभाराची माहिती कमी स्पष्टीकरण जास्त द्यावे लागले.

केंद्रीय गृह संयुक्त सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी कोणत्याही पार्श्वभूमीविना देशभरात किती लोक स्थलांतर करतात याची आकडेवारी दिली. देशांतर्गत सुमारे ४ कोटी लोक रोजगारानिमित्त स्थलांतरित होतात, ही माहिती फक्त तुम्हाला सांगायची होती, असे श्रीवास्तव म्हणाल्या. पण, अनावश्यक दिलेल्या या माहितीमुळे यादव यांची कोंडी झाली. आत्तापर्यंत रेल्वेने १ मेपासून २३ दिवसांमध्ये २६०० श्रमिक विशेष रेल्वे सोडल्या आणि त्याचा ३५ लाख मजुरांनी लाभ घेतला.

देशात ४ कोटी लोक स्थलांतरित असतील तर समजा रेल्वेने निम्म्या स्थलांतरितांना म्हणजे दोन कोटींना पोहोचवायचे ठरवले तरी किती दिवस श्रमिक रेल्वे चालवणार असा प्रश्न विचारला गेला. त्यावर, गरज असेपर्यंत श्रमिक रेल्वे चालवल्या जातील, असे उत्तर देऊन यादव यांनी सुटका करून घेतली.

देशाच्या विविध रेल्वे स्थानकांवरून सुटणाऱ्या श्रमिक रेल्वेंपैकी ८० टक्के रेल्वे उत्तर प्रदेश व बिहार या दोन राज्यांकडे जात असल्याने या मार्गावर गर्दी झालेली असल्याचे यादव म्हणाले. याच उत्तर प्रदेशला जाणारी रेल्वे मुंबईहून ओडिशात कशी पोहोचली, हा प्रश्न पत्रकारांनी सामुदायिक विचारला. त्यावर, उत्तर-बिहारच्या मार्गावर रेल्वेगाडय़ांची गर्दी झाली आहे. मार्ग व्यस्त असतील तर दुसऱ्या मार्गाने रेल्वेगाडी धावते. वेगळ्या मार्गाने रेल्वे जाणे ही नियमित प्रक्रिया आहे, असे सांगून यादव यांनी रेल्वेच्या ‘कारभारा’ला सावरून घेतले.

रेल्वेने १ जूनपासून १०० रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रतीक्षा यादीही तयार केली जाणार आहे. ही यादी मर्यादित असते, पण त्यापेक्षा जास्त तिकिटे दिली जात आहेत. असे करून रेल्वेला या प्रवाशांकडून पैसे मिळवायचे आहेत का, यावर यादव म्हणाले की, रेल्वे पैसे मिळवू इच्छित नाही, पण प्रतीक्षा यादीतील व्यक्तीचे तिकीट निश्चित झाले तर  तिला प्रवासाची संधी मिळू शकेल.

रेल्वे आणि राज्यांमध्ये समन्वय नाही असे दिसते, यावर यादव म्हणाले की, विविध राज्यांचे नोडल अधिकारी चोवीस तास एकमेकांच्या संपर्कात असतात. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांत श्रमिक रेल्वेत जात आहेत. पश्चिम बंगालमध्ये वादळामुळे अडचण असली तरी तिथेही रेल्वे पाठवल्या जातील.