News Flash

“ही आपलीच माणसं आहेत”; भाजपाच्या खासदारानेच अमित शाह यांना करुन दिली आठवण

मजुरांना होणाऱ्या त्रासासंदर्भात चिंता व्यक्त करताना त्यांच्या प्रवासाची सोय करण्याची केली मागणी

खासदार ओम प्रकाश माथुर आणि अमित शाह (प्रातिनिधिक फोटो)

पीएम केअर्स निधीमधील एक हजार कोटी रुपये हे स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ राज्यांमध्ये परत सोडण्यासाठी वापरण्यात यावे अशी मागणी करणारे एक पत्र भाजपाच्या राज्यसभेच्या खासदाराने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिले आहे. यासंदर्भातील वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिले आहे. देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर हाती काहीच काम नसल्याने लाखो स्थलांतरिक कामगारांनी पायीच चालत आपल्या राज्यात परत जाण्याचा निर्णय घेतल्याने शेकडो कामगार रस्त्यांच्या बाजूने पायी चालत आपल्या राज्यांमध्ये निघाल्याचे फोटो आणि व्हिडिओ मागील अनेक दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या खासदाराने गृहमंत्र्यांना पत्र लिहून, “ये हमारे ही लोग हैं” म्हणजेच ही आपलीच माणसं आहेत अशी आठवण करुन दिली आहे. तसेच शेकडो किलोमीटर रस्त्यावरुन पायी प्रवास करणाऱ्या मजुरांचे अनेक फोटो समोर येत असल्याने या सर्वांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होईल अशी शक्यताही या खासदाराने व्यक्त केली आहे.

भाजपाचे राज्यसभेचे खासदार ओम प्रकाश माथुर यांनी अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. “ही सर्व आपलीच लोकं आहेत. त्यांना होणारा त्रास आता गहण चर्चेचा विषय बनत चालला आहे,” असं ओम प्रकाश यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. या सर्वाचा पक्षाच्या राजकारणावर प्रतिकूल परिणाम होईल असं अंदाज काही राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला असून त्याचेच संकेत ओम प्रकाश यांनी आपल्या पत्रातून वरिष्ठांना दिल्याचे पक्षाच्या सुत्रांकडून सांगिलं जात आहे.

“तुम्हाला ठाऊक असेल की ज्याप्रमाणे मागील अनेक दिवसांपासून वृत्तवाहिन्या तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपण सर्वच पाहत आहोत की श्रमिक मजूर हे शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत आपल्या राज्यात परत जात आहेत. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो की पीएम केअर्स निधीमधून या स्थलांतरिक मजुरांच्या कल्याणासाठी एक हजार कोटींची तरतूद करावी. हे पैसे या मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये पोहचवण्याची व्यवस्था करण्यासाठीच वापरण्यात यावेत. या माध्यमातून हे मजूर सुखरुपपणे आपल्या घरी पोहचतील,” असं या खासदाराने पत्रामध्ये म्हटलं आहे. हे पैसे केंद्र सरकारने राज्य सरकांच्या माध्यमातून न वापरता थेट मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी वापरावेत असा सल्लाही ओम प्रकाश यांनी दिला आहे.

या पत्रामधून ओम प्रकाश यांनी राज्य सरकारांवर निशाणा साधला आहे. राज्यांमधील वैचारिक मतभेदांमुळे स्थलांतरिक मजुरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केलं आहे. “केंद्राने या कठीण प्रसंगी अनेक उपाययोजना केल्या आहेत मात्र राज्याराज्यांमधील मदभेदांमुळे मजुरांचे हाल होत आहेत,” असं ओम प्रकाश यांनी म्हटलं आहे.

पीएम केअर्स निधीमधून नुकतीच एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून हे पैसे या मजुरांचा प्रवास, आरोग्य तपासणी, राहण्याची आणि खाण्याची सोय यासाठी वापरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र आता स्थलांतरित मजुरांची संख्या पाहता केवळ प्रवासासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्याची मागणी भाजपाच्या खासदाराने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 11:21 am

Web Title: rajya sabha member om prakash mathur write to amit shah ye hamare hi log hain scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मोदींच्या योजनेला ट्रम्प यांचा विरोध; इशारा देताना म्हणाले, “अ‍ॅपलने चीनमधून भारतात उद्योग नेल्यास…”
2 पाकव्याप्त काश्मीरमध्ये धरणाचं बांधकाम; चीन म्हणतं हे तर लोकांच्या भल्यासाठी
3 “या संकटकाळात आम्ही कर्मचाऱ्यांसोबत आहोत” असं सांगत ‘या’ कंपनीने घेतला पगारवाढीचा निर्णय
Just Now!
X